पुणे : महायुतीमधील तिन्ही पक्षांचे नेते जो उमेदवार ठरवतील, त्यांचे महायुतीने काम करायचे आहे. उमेदवारीबाबत नाराजी ठेवून नुकसान करू नका, असे सांगतानाच पुणे शहर जिल्ह्यातील २१ जागांवर आपल्याला समन्वयाने काम करायचे आहे. प्रचारात विधानसभा निहाय बैठका, मेळावे, मोठ्या सभांचेही नियोजन होणार आहे. आगामी ३० दिवसांचे नियोजन केले जाणार आहे. प्रचारातील अडचणींबाबत थेट उमेदवाराला फोन करून त्रास देऊ नका, समन्वय समितीशी संपर्क करा, अशा सूचना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिल्या.
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) महायुतीच्या समन्वय समितीची बैठक कोथरूड येथे झाली. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, राहुल कुल, शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर, शरद बुट्टे पाटील, वासुदेवनाना काळे, शिवसेनेचे किरण साळी, प्रदीप गारटकर, रिपाइं आठवले गटाचे संजय सोनावणे, दिगंबर दुर्गाडे, दीपक मिसाळ, यमराज खरात, समन्वयक संदीप खर्डेकर आदी उपस्थित होते.
मुरलीधर मोहोळ म्हणाले की, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवाराचे नाव पहिल्या यादीत आले नसले, तरी दुसऱ्या यादीत येईल. पक्षातर्फे योग्य उमेदवाराला संधी दिली जाईल. नाराज कार्यकर्त्यांची नाराजी दूर होईल, कोणीही राजीनामे देणार नाहीत.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत सहा मतदारसंघात आमचा ६ हजार ते २१ हजार मतांनी पराभव झाला. तेथे प्रत्येक बूथवर थोडे मत वाढले असते, तर या जागा जिंकू शकलो असतो. पश्चिम महाराष्ट्रात महायुतीचे ४५ आमदार आहेत, ते पुन्हा निवडून आले, तर राज्यात महायुतीची सत्ता येऊ शकते.
आम्ही हजार रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ मराठा आरक्षण टिकेल
जे आरक्षण आम्ही दिले ते उद्धव ठाकरे यांनी घालवले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मराठा आरक्षण दिले, ते न्यायालयात टिकले आहे. त्यामुळे आमचे नेमके काय चुकले हे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सांगावे. मराठा समाजाला जातीच्या आधारावर आरक्षण मिळाल्यानंतर ईडब्ल्यूएसचे आरक्षण गेले आहे, जरांगे पाटील यांनी मुद्द्याचे आणि लॉजिकल बोलावे. आम्ही दिलेले मराठा आरक्षण टिकेल हे आम्ही १ हजार रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून देण्यास तयार आहोत, असे चंद्रकांत पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल विचारले असता सांगितले.