म्हातोबा टेकडीवर नक्षत्र वनाच्या कामाचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनीदेखील याबाबत ट्विट करून नेमका काय प्रकार आहे, ते जाणून कार्यवाही करू, असे सांगितले आहे. त्यांनाही या प्रकल्पाची काहीच माहिती नाही.
निसर्गप्रेमी पंकज आनंद म्हणाले, शहरातील उद्याने नीट जपावीत, टेकड्यांवर काहीही घाण करू नये. त्या जशा आहेत, तशाच ठेवाव्यात. तर अॅड. विंदा महाजन म्हणाल्या, म्हातोबा टेकडीवर नक्षत्र वनाची संकल्पना स्वागतार्हच आहे, पण त्यासाठी कोणतेही कृत्रिम मटेरियल वापरू नये, असे बांधकाम, म्हणजे पैशांचा चुराडा आहे. असा खर्च करण्यापेक्षा वणवे रोखण्यासाठी ठोस उपाय करावे. तसेच, वनविभाग करत असलेल्या कामाविषयी माहितीफलक लावावे.’’
-------------------------------------
संस्थांकडून वनसंरक्षकांना पत्र
टेकडीवरील सिमेंटीकरणाला विरोध करत इकॉलॉजिकल सोसायटीच्या अध्यक्षा स्वाती गोळे, डेक्कन जिमखाना परिसर समितीचे सुषमा दाते, सुमिता काळे, माधवी राहीरकर, पुष्कार कुलकर्णी यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक, नागपूर, वनसंरक्षक पुणे आणि उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्याकडे तक्रार अर्ज पाठवले आहेत. टेकडीवर कोणतेही सिमेंटीकरण नको असून, नक्षत्र वनाचे ब्लॉक्स, जिमचे साहित्य त्वरित काढून टाकावेत, अशी मागणी केली आहे. त्यांनी नमूद केले आहे की, टेकडीवरील जैवविविधता जपावी आणि कोणतेही कृत्रिम बांधकाम करू नये, अन्यथा फिरायला येणाऱ्या नागरिकांकडून तीव्र विरोध करण्यात येईल. यापूर्वी देखील असे प्रयत्न झाले, पण ते होऊ दिले नाहीत. त्यामुळे येथील नागरिकांना टेकड्यांचे संवर्धन करायचे असून, वन विभागानेदेखील नैसर्गिकपणे टेकड्या जपाव्यात.’’
———————————
एक ग्रुप तर टेकडीवर झाडं लावत सुटलाय. टेकडीची जैवविविधता काय असते, ते समजूनच घेत नाहीत. उठले की कुठंही झाडं लावत सुटतात. टेकडीवरील वन्यजीवांचे काय जीवन असते, त्यांना काय आवश्यक असते, ते पाहून कामं करायला हवीत. टेकडीची जमीन म्हणजे परसबाग नव्हे, की कोणतीही झाडं लावा.
- आभा भागवत, म्हातोबा टेकडीचे संवर्धनासाठी काम करणाऱ्या निसर्गप्रेमी
----------------