पुणे : सध्याचा काळ कठीण आहे. वैश्विक महामारी असलेल्या कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी एकजुटीची आवश्यकता आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी कोरोनाच्या काळात तरी राजकारण करू नये असा सबुरीचा सल्ला महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षांना दिला असून तीनही पक्षांच्या शहराध्यक्षांना तसे आवाहन केले आहे. राज्यात या तीनही पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. तरीही मागील ४० दिवसात हे शहराध्यक्ष मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी का बोलले नाहीत असा सवाल महापौरांनी केला आहे. बुधवारी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आणि आमदार चेतन तुपे-पाटील यांनी महापालिकेत पत्रकार परिषद घेत यामध्ये महापौर आणि आयुक्त यांच्यामध्ये समन्वय नसल्याचे सांगितले होते. झोपडपट्ट्यांमध्ये कोरोना वाढत असतानाही उपाययोजनांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप केला होता. महापौर ट्विटरवर केवळ टीवटीव् करीत असल्याची टीका केली होती. या टीकेला महापौर मोहोळ यांनी प्रत्युत्तर दिले. शासनाच्या आदेशानुसारच शहरातील लॉक डाऊन शिथिल करण्यात आले आहे. हा निर्णय चुकीचा वाटल्याने आपण त्याला विरोध केला असून पालिका आयुक्तांना हा निर्णय मागे घेण्याची विनंतीही केली आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त हे राज्य शासनाच्या आदेशानुसार काम करीत आहेत. या निर्णयाचा परिणाम पाहायला मिळत असून पुण्यात लाखो लोक रस्त्यावर आले आहेत. हा निर्णय चुकीचा असून त्यामुळे भविष्यात रुग्ण संख्या वाढू शकते. यासंदर्भात तीनही पक्षांचे शहराध्यक्ष राज्य शासनाशी का बोलत नाहीत? आपण स्वत: महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पुणे विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त यांच्याशी सातत्याने संवाद साधत असल्याचे।महापौरांनी स्पष्ट केले.
पालिका आयुक्तांच्या विरोधात पत्रकार परिषद घेत त्यांचे काम चांगले नसल्याची, त्यांच्यामुळे कोरोना वाढल्याची आणि त्यांना तातडीने राज्य शासनाच्या सेवेत परत बोलविण्याची मागणी या तिन्ही पक्षांच्या गटनेत्यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती. गटनेत्यांच्या या भूमिकेच्या विरोधी भूमिका त्यांच्या पक्षाच्या शहराध्यक्षांनी घेतली आहे. तीनही शहराध्यक्ष आयुक्त चांगले काम करीत असल्याचे सांगत आहेत. हा विपर्यास असल्याचे महापौर म्हणाले.