लोकमत न्यूज नेटवर्क
मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील राजगडाचा सिंहगड करू नका, अशी मागणी शिवशंभू प्रतिष्ठान, राष्ट्रसेवा समूह, दुर्गरक्षक संघटना व आदी संघटनांनी केली आहे. याबाबत शिवशंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश कदम, राष्ट्रसेवा समूहाचे अध्यक्ष राहुल पोकळे, बारामावळ परिसराचे अध्यक्ष सचिन खोपडे, दुर्गरक्षक प्रतिष्ठानचे पप्पू लिपाणे, विकास साळुंखे आदींनी पत्रकार परिषद घेऊन किल्ल्याच्या रोपवेसाठी विरोध केला आहे. गरज पडल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलनदेखील केले जाणार असल्याचे यावेळी महेश कदम यांनी यावेळी सांगितले.
वेल्हे तालुक्यातील किल्ले राजगडावर रोपवेसाठी मंजुरी मिळाली आहे. किल्ले राजगडावर रोपवेसाठी स्थानिकासह शिवप्रेमी संघटनाचा विरोध आहे. याचे कारण म्हणजे किल्ले राजगडावर स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले. अनेक लढाया, मोहिमा किल्ले राजगडावर यशस्वीपणे पार पाडून स्वराज्याचा राज्यकारभार २५ वर्षे किल्ले राजगडावरून केला. राजगड ही अतिशय पवित्र आहे. महाराष्ट्राचे दैवत किल्ले राजगड आहे. रोपवेमुळे किल्ल्याचे पावित्र्य धोक्यात येण्याची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या पर्यटकांना किल्ल्याच्या दऱ्याखोऱ्यांतून गेल्याशिवाय इतिहासाचा पराक्रम मोहिमा कशा समजणार? तसेच किल्ले राजगडावर रोपवे झाल्यास पर्यटनस्थळ म्हणून त्याचा वापर केला जाईल. हौसे नवसे किल्ल्यावर जातील. मद्यधुंद अवस्थेत किल्ल्याचे पावित्र्य धोक्यात आणतील. तांत्रिकदृष्ट्या विचार केल्यास किल्ले राजगडावर रोपवेसाठी पुरेशी सपाट जागा नाही, किल्ल्यावर गर्दी झाल्यास त्याचे नियोजनदेखील नाही. रोपवेसाठी सपाट जागा लागते. किल्ल्यावरील एखादी ऐतिहासिक वास्तू पाडूनच रोपवे करावा लागणार आहे. महाराजांनी बांधलेला किल्ले राजगड आजही मोठ्या दिमाखात इतिहासांची साक्ष देत आहे. अशी एेतिहासिक वास्तू रोपवेमुळे नष्ट करू नका, अशी मागणी यावेळी संस्था व संघटनांनी केली आहे.
चौकटीसाठी ओळ - १) राजगड ही छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी असून रोपवेमुळे या वास्तुचे पावित्र्य धोक्यात येणार आहे आणि ते आम्ही होऊ देणार नाही - महेश कदम, अध्यक्ष, शिवशंभू प्रतिष्ठान, कात्रज
२) राजगडावर रोपवे झाल्यास किल्ल्यावर हौशी पर्यटक आल्याने किल्ल्यावर अनैतिक गोष्टी सुरू होतील. त्यामुळे आमचा रोपवेसाठी विरोध आहे.- राहुल पोकळे, अध्यक्ष, राष्ट्रसेवा समूह, धायरी