पुणे : ग्रामीण भागातील नागरिकांचे दारूचे व्यसन सोडविण्यासाठी राज्य सरकारने कीर्तनकारांची मदत घेण्याचे ठरवले होते. मात्र, मध्यंतरी कोरोना प्रादुर्भावाच्या दोन वर्षांच्या काळात असे कीर्तन झाले नाही. त्यामुळे प्रबोधनाचे काम रखडले. कीर्तन न झाल्याने या कीर्तनकारांना मानधन मिळाले नाही. परिणामी त्यांना आता अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कीर्तनकार हे राजकीय नेते, समाजसेवकांपेक्षाही जास्त संख्येने समाजाशी संवाद करतात. ते वर्षभरात सुमारे एक लाख लोकांशी बोलतात. ते व्यसनमुक्तीबाबत जनजागरण करू शकतात. मुळात प्रबोधनातून व्यसनमुक्ती ही संत गाडगेबाबा व संत तुकडोजी महाराज यांची प्रेरणा आहे. त्यामुळे कीर्तनकारच दारूबंदीचे आंदोलन जनसामान्यांपर्यंत पोचवू शकतात, या आशावादातून राज्य सरकारने कीर्तनकारांना या जनजागृतीसाठी मानधन तत्त्वावर नेमले.
दोन वर्षांपासून कीर्तन बंद
गेल्या दोन वर्षांच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने प्रबोधन तर सोडाच सामान्य परिस्थितीत होणारे कीर्तनही बंद होते. त्यामुळे सरकारने नेमलेल्या कीर्तनकारांना मानधन मिळत नव्हते. परिणामी त्यांची चांगलीच अडचण झाली आहे.
कीर्तनकारांना पाच हजार मानधन
या कामासाठी राज्य सरकारच्या समाजकल्याण विभागाकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांचे मानधन दिले जात होते. मात्र, सामान्य कीर्तनासाठी एरवी कीर्तनकार एक हजार ते एक लाख रुपयांपर्यंत मानधन घेतात. गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने गावागावांतून कीर्तन सुरू झाले आहे. साधारण जानेवारी ते मे असा कीर्तनांचा हंगाम असतो.
-आळंदी, देहूत वारकरी संस्था
पुणे जिल्ह्यात आळंदी व देहू ही तीर्थक्षेत्र असल्याने कीर्तनकार घडविणाऱ्या वारकरी संस्था या भागात मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यातून तयार होणारे कीर्तनकार हे राज्यभर संतांचे विचार पोहचविण्याचे काम करतात. त्यातून प्रबोधनाचे कामही होते.
जिल्ह्यातील २०२१-२२ मधील दारूचा खप
प्रकार खप (लाख लि.)
देशी २७०.७
विदेशी ३४८.७५
बीअर ३५२.७९
वाईन १६.७९
कीर्तन ही भगवंताची सेवा आहे. कोरोना काळात सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी होती. त्यामुळे कीर्तनही बंद होते. कीर्तनकारांचा चरितार्थ त्यावरच चालतो. या काळातील मानधन न मिळाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
- पुरुषोत्तम महाराज पाटील, कीर्तनकार