पुणे : दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या विरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली असून, शहरातील विविध भागांत नाकाबंदी करून १५४ मद्यपी चालकांवर कारवाई केली. गुरुवार आणि शुक्रवारी (दि. ३० व ३१) या दोन दिवसांत ही कारवाई केली आहे.
यादरम्यान एकूण दोन हजार ५७३ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यातील १५४ वाहनचालक मद्यपान करून वाहन चालवत असल्याचे उघडकीस आले. फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये सर्वांत जास्त १४ कारवाया करण्यात आल्या. त्यानंतर मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत १० आणि खडक व कोरेगाव पार्क पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी नऊ कारवाया केल्या आहेत. ड्रंक ॲण्ड ड्राइव्हसोबत इतर ६८५ कारवाया करून सहा लाख २४ हजार ६५० रुपयांचा दंड आकारण्यात आला. त्यातील एक लाख ४९ हजार ८०० रुपये दंड नाकाबंदी दरम्यानच वसुल करण्यात आला आहे.
प्रत्येक नाकाबंदीवर दोन पोलिस अधिकारी अन् सात अंमलदार :
वाहतूक शाखा व स्थानिक पोलिस स्टेशन यांच्याकडून संयुक्तपणे संपूर्ण पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत २२ पोलिस ठाणे अंतर्गत २४ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. या कारवाईसाठी प्रत्येक पोलिस ठाण्यातील एक पोलिस अधिकारी व चार अंमलदार, वाहतूक शाखेकडील एक पोलिस अधिकारी व तीन अंमलदार याप्रमाणे एका नाकाबंदीच्या ठिकाणी दोन पोलिस अधिकारी व सात अंमलदार नेमण्यात आले होते. ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह कारवाईसाठी ब्रेथ ॲनालायझरचा वापर करण्यात आला.