बारामती : तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी होत असली तरी सर्वांनी सतर्कता बाळगावी, आपल्याला गाफील राहून चालणार नाही. उपचार यंत्रणा सज्ज ठेवण्यासोबतच कोरोनाच्या चाचण्या व सर्वेक्षणात सातत्य ठेवा. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढताना त्याचा विकास कामांवर परिणाम होणार नाही याची खबरदारी घ्या, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
बारामतीमधील विकासकामांच्या पाहणी दौऱ्यानंतर येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात शनिवारी (दि. ३१) कोविड -१९ विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
पवार म्हणाले, बारामती तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी होत असली तरी सर्वांनी सर्तकता ठेवावी, गाफील राहून चालणार नाही. उपचार यंत्रणा सज्ज ठेवण्यासोबतच चाचण्या व सर्वेक्षणात सातत्य ठेवा. कोरोनाच्या संभाव्य तिसºया लाटेशी लढताना त्याचा विकास कामांवर परिणाम होणार नाही याची खबरदारी घ्यावी. सर्व विभागांनी समन्वय साधून काम करावे. कोणत्याही परिस्थितीमध्ये पॉझिटिव्हीटी रेट वाढणार नाही याची दक्षता घ्यावी. नागरिकांनी मास्क वापरावा, कोरोना प्रादुभार्वाबाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. अशा सूचनाही यावेळी पवार यांनी दिल्या.
या बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कºहा नदी सुधार प्रकल्प, अप्पर पोलिस अधिक्षक कार्यालयाची नविन इमारत, परकाळे बंगला येथील कॅनलवरील रोड व सुशोभिकरण, क्रीडा संकुल, देसाई इस्टेट येथील रस्त्याची पाहणी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नविन विश्रामगृह इत्यादी कामाची पाहणी करून संबंधित विभागाच्या अधिकाºयांना विकासकामांबाबत योग्य त्या सूचना देऊन विकासकामे दजेर्दार आणि वेळेत पूर्ण करावीत अशा सूचना दिल्या.यावेळी विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.---------------------------उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून पूरग्रस्तांसाठी मदतीच्या साहित्याची वाहने रवाना करण्यात आली. बारामती तालुका बॅडमिंटन असोसिएशन तर्फे ५० हजार रुपयांचे रेनकोट दरे (ता. महाबळेश्वर) येथील पूरग्रस्तांना पाठवण्यात आले. सिद्धिविनायक तरुण मंडळ जाचक वस्ती , सणसर (ता. इंदापूर) यांच्या तर्फे ५० हजार रुपयांचे रेनकोट व भाजीपाला दरे (ता. महाबळेश्वर) येथील पूरग्रस्तांना पाठविण्यात आले. सिल्वर ओक युवा प्रतिष्ठान सणसर (ता. इंदापूर) यांच्यातर्फे जीवनावश्यक वस्तूंचे २५० फूड पॅकेट. दरे (ता. महाबळेश्वर) येथील पूरग्रस्तांना पाठविण्यात आले.