विवेक भुसे/किरण शिंदे
पुणे : काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देऊन ३० लाख रुपये मागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे़ याप्रकरणी समर्थ पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे़ हा प्रकार भवानी पेठेत मंगळवारी दुपारी ३ ते पावणेसात वाजण्याच्या सुमारास घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार काल म्हणजेच चार मार्च रोजी दुपारी पावणे चार च्या सुमारास घडला. अविनाश बागवे यांना काल एका अज्ञात इसमाने व्हाट्सअप वर मेसेज करून "तीस लाख रुपये दे नाहीतर तुझं पॉलिटिकल करिअर बरबाद" करू अशी धमकी आली. तसेच पुढे या व्यक्तीने, "तुला माहिती नाही आम्ही सात आठ जण आहोत. पोलिसांनी आमच्यामधील दोघांना जरी आत टाकलं तरी आम्ही तुझ्या ऑफिसच्या आणि घराबाहेर असतो" असा आणखी एक मेसेज आला. या सगळ्या प्रकरणानंतर अविनाश बागवे यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अज्ञात व्यक्ती विरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
अविनाश बागवे हे माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचेपुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांचे सुपुत्र आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेश सरचिटणीस यांच्या नावाने खंडणी उकळण्याचा प्रकार घडला असतानाच काही दिवसातच भाजपचे नेते गणेश बिडकर यांना खंडणीसाठी फोन केला होता. या दोन्ही घटना ताज्या असतानाच आता काँग्रेसच्या नेत्याला नेमकी खंडणी कोणी मागितली याचा शोध पोलीस घेत आहेत.