Ajit Pawar: उमेदवारी न मिळाल्यास रुसवे फुगवे, नाराजी दाखवू नका; अजित पवारांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 19:26 IST2025-04-24T19:25:49+5:302025-04-24T19:26:18+5:30
दादा यावेळी आमच्या गावचा विचार करा, पक्षाचे प्रमाणिक काम करतोय, भविष्यात देखील करत राहु; उमेदवारांनी घातली अजित पवारांना साद

Ajit Pawar: उमेदवारी न मिळाल्यास रुसवे फुगवे, नाराजी दाखवू नका; अजित पवारांचे आवाहन
बारामती : श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडुकीसाठी ३५० पेक्षा जास्त अर्ज आले आहे. त्यातून २१ लोक निवडायचे तर सगळ्यांना समाधानी करता येत नाही. एक दोन दिवसांत प्रमुख लोकांबरोबर बसून नावांची यादी निश्चित करण्यात येईल. परंतु एकदा पॅनेल जाहीर झाल्यानंतर भवानीमाता मंदिरात प्रचाराचा नारळ मी स्वतः फोडणार आहे. सांगता सभेलाही मी येणार आहे. पण मधल्या काळात उमेदवारी नाही मिळाली तर काम करा. रुसवे फुगवे, नाराजी दाखवू नका,असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
बारामती येथे सर्वपक्षीय पॅनलसाठी इच्छुकांच्या मुलाखती उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह क्रिडामंत्री दत्तात्रय भरणे, पॅनलप्रमुख पृथवीराज जाचक, निवडणुक समन्वयक किरण गुजर, माजी अध्यक्ष प्रशांत काटे यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्या. यावेळी पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, कारखान्यासाठी राज्य सरकार, विविध बॅंकांकडून मदत घ्यावी लागेल. ठेव वाढवावी लागेल. भवानीमाता पॅनेलच्या जाचक यांच्या नेतृत्वात २१ संचालक असतील. तेथे काटकसर करावी लागेल. मिटींगला फक्त चहाच घ्यावा लागेल. गाडया वापरता येणार नाहीत. ड्रायव्हर वापरता येणार नाही. हजेरी लावून फिरणाऱ्या कामगारांवर जरब बसवावा लागेल. काही गोष्टी तर मी सांगू शकत नाही इतके प्रकार कारखान्यात घडलेत. उन्हाळ्याची तीव्रता जास्त आहे. आमचा प्रयत्न बिनविरोधचा आहे. पण काहींनी ठरवलेच पॅनेल उभे करायचे तर ती त्यांची मर्जी. पण जेवढे शक्य आहे तेवढे समजून सांगण्याचा प्रयत्न आहे. लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार, त्या खोलात मी जात नाही. काही काही जण मुद्दाम काहींना हुसकारवून देण्याचा प्रयत्न करतील. आपल्यावर आलेले संकट दूर करण्याचे काम आहे. आपल्या पूर्वजांनी उभे केलेले वैभव जपण्याचे काम आहे. सर्वांनी साथ द्या, सहकार्य करा. छत्रपतीला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखाली काम करू. पूर्ण पाच वर्षे त्यांच्या नेतृत्वात काम होईल. एक नंबर गटाला पाच वर्षे चेअमन अन्य गटांना एकेक वर्षे उपाध्य़क्षपद देणार असल्याचे पवार म्हणाले.
....दादा एकवेळ संधी द्या
मुलाखती दरम्यान इच्छुांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उमेदवारी देण्याची साद घातली. दादा यावेळी आमच्या गावचा विचार करा, पक्षाचे प्रमाणिक काम करतोय, भविष्यात देखील करत राहु. एकवेळ संधी द्या, संधीचे नक्कीच सोने करु. हाक माराल तिथ उभा राहु, घरच्या प्रपंचाप्रमाणे कारखान्याचा प्रपंच करु, अशा शब्दात इच्छुकांनी उमेदवारी मिळण्यासाठी पवार यांना साकडे घातले
....मी जन्मापासून कशालाच शिवलो नाही
मुलाखती दरम्यान एका इच्छुकाने १९८१ पासून पुर्ण निर्व्यसनी असल्याचे अजित पवार यांना सांगितले. त्यावर पवार यांनी १९८१ पुर्वीचे काय, असा मिश्कील प्रश्न विचारला. त्यावर ज्येष्ठांनी थोडे स्वस्तातील मद्यपानाचे व्यसन करत असल्याची कबुली दिली. त्यावर अजित पवार यांनी ‘मी जन्मापासून कशाला शिवलो नाही,असे त्या ज्येष्ठाला सांगितले. यावेळी उपस्थितांमध्ये हशा पिकला.