फायनान्स कंपनीस धरले धारेवर
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कर्ज वसुलीसाठी रिक्षा चालकांना धमकाविणे, गुंडांकडून बळाचा वापर करणे आता फायनान्स कंपनीस महागात पडू शकते. कारण अशा कंपनीवर कारवाई करण्याचे संकेत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. तसेच रिक्षा चालकांच्या खात्यात जमा होणारी १५०० रुपये अनुदानाची रक्कम देखील वर्ग करू नये, अशाही सूचना यावेळी देण्यात आल्या.
गेल्या काही दिवसांत फायनान्स कंपनीविरोधात रिक्षा संघटना आंदोलने करून कडक कारवाईची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यावर तोडगा काढण्यासाठी बैठक बोलाविली. यात प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर, विविध बँकांचे, अर्थसंस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी रिक्षा चालकाच्या तक्रारीवर चर्चा होऊन जिल्हाधिकारी यांनी फायनान्स कंपनीवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
----------------------
रिक्षा चालकांच्या ह्या प्रश्नी आम्ही सातत्याने भांडत होतो. प्रसंगी आंदोलने देखील केले. त्यावेळी प्रशासनाने हा प्रश्न निकाली काढण्यासाठी बैठक घेऊ असे आश्वासन दिले. त्यानुसार ही बैठक झाली.
अनुदानाची रक्कम बँकेने कापू नये अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
- नितीन पवार, सरचिटणीस, रिक्षा पंचायत, पुणे