- शरीरावर होतात घातक परिणाम, रक्तदाब, लठ्ठपणा, डोकेदुखीचा त्रास
पुणे : सध्या अनेकांना चायनीज हा खाद्यपदार्थ खूप आवडतो. त्यामुळेच शहरात चायनीजचे गाडे वाढलेले दिसतात; परंतु, या चायनीजमध्ये जो अजिनोमोटोचा वापर केलेला असतो, तो आपल्या शरीराला घातक ठरतो. त्यामुळे चायनीज खाताना याचा विचार करावा आणि आपले आरोग्य सांभाळावे अन्यथा चायनीज खाऊन तुम्ही आजाराला निमंत्रणच देत आहात.
सर्वसामान्यपणे अजिनोमोटो म्हणून ओळखला जाणारा पदार्थ, शास्त्रीयदृष्ट्या, मोनोसोडियम ग्लुटामेट असतो. चायनीज पदार्थ बनविण्यासाठी वापरण्यात येणारा हा पदार्थ, संशोधनाप्रमाणे, क्वचितप्रसंगी अगदी कमी प्रमाणात घेतला गेला, तर कदाचित फारसा हानिकारक नाही; परंतु अधिक प्रमाणात, वारंवार खाण्यात आल्यास शरीराला त्रासदायक ठरू शकतो. उच्च रक्तदाब, लठ्ठपणा तसेच मानसिक आरोग्य व झोपेवरही परिणाम करू शकतो.
बाहेरचे चायनीज कधीतरीच खाणाऱ्या किंवा न खाणाऱ्या लोकांना असे वाटते, की त्यांच्या आहारात अजिनोमोटोचा समावेश नाही; परंतु अनेक पॅकिंग फूड उत्पादनात जसे की, घराच्या घरी रेस्टॉरंटसारखे जेवण देणारे मसाले, दोन मिनिटांत बनणारी सूप, मॅजिक मसाले, चिप्स अशा गोष्टींमध्ये ते असते. तसेच फ्लेव्हरसाठीही ह्याचा समावेश असतो आणि त्यामुळे माहीत नसताना अनेक लोक याचे सेवन करीत असतात.
——————————————
अजिनोमोटो आणि असे बाकीचे फ्लेवरचे पदार्थ टाळण्यासाठी सर्वांत उत्तम उपाय म्हणजे घरी घरच्यासारखे जेवा आणि रेस्टॉरंटसारखे जेवण बाहेर जाऊन कधीतरी खाण्यापुरते मर्यादित ठेवा. अती खाल्ले तर त्याचा विपरीत परिणाम होतो.
- कस्तुरी भोसले, आहारतज्ज्ञ
———————-
खारट चवीसारखा...
अजिनोमोटोचा वापर जास्त करून चीनमध्ये तिथल्या खाद्यपदार्थांमध्ये केला जातो. हे खाद्यामध्ये वापरतात. हा मसाला नाही. हा एक तुरटीसारखा चव असणारा पदार्थ आहे. आपण जसे आंबट, गोड, तिखट, खारट खातो; तसेच हा एक चवीसाठीचा पदार्थ आहे. जो थोडा तुरटसारखा आहे. आपण पॅकिंगचे फूड खातो, ते अधिक दिवस या अजिनोमोटोमुळे स्वादिष्ट राहते.
——————————————
दुष्परिणाम काय?
- अजिनोमोटोची चव मिठासारखी लागते. या कारणामुळे म्हणतात, की ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे. त्यांनी खाऊ नये.
- अजिनोमोटोचा खूप वापर डोळ्यांसाठी घातक ठरू शकतो.
- पॅकिंग फूड अधिक खाल्ल्याने तुमची जाडी वाढू शकते.
- अजिनोमोटोला लहान मुलांच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असते. त्यामुळे लहान मुलांपासून हे दूरच ठेवा.
- हृदयविकार असणाऱ्या लोकांनी अजिनोमोटो खाऊ नये.
- ज्यांना डोकेदुखीचा त्रास आहे, सतत डोके दुखत असते त्यांच्यासाठी हे घातक आहे. याने मायग्रेनचा त्रास वाढू शकतो.
——————————————-