पुणे: आराेग्य, पाेषण, स्वच्छता, वैयक्तिक काळजी, लसीकरण याबाबत माहीती देणारे मातृभाषेतील आराेग्य विभागाचे ‘किलकारी’ काॅलकडे गराेदर मातांकडून दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात महिनाभरात असे सुमारे दाेन लाख काॅल करण्यात आले असून त्यापैकी २२ टक्केच (४१ हजार ६२४) काॅल हे शेवटपर्यंत ऐकले गेले आहेत. तर जवळपास २६ हजार ५६ काॅल असे आहेत की जे एकुण वेळेपैकी २५ टक्के ऐकले व त्यानंतर त्यांनी कट केले. हे काॅल पूर्णपणे ऐकावेत आणि त्याप्रमाणे आराेग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आराेग्य यंत्रणेद्वारे करण्यात आले आहे.
राष्ट्रीय प्रजनन व बाल आराेग्य कार्यक्रमांतर्गत आरसीएच पाेर्टलद्वारे गराेदर माता व शुन्य ते एक वयाेगटातील बालके यांची माहीती संकलित करून दर्जात्मक आराेग्य सेवा देण्यासाठी ‘किलकारी’ काॅल हा उपक्रम सूरू केला आहे. याअंतर्गत साप्ताहिक व समयबध्द ७२ श्राव्य (ऑडिओ) मराठी भाषेतील काॅल प्रत्येक आठवडयात येणार आहेत. गर्भारपणाच्या चाैथ्या महिन्यापासून प्रसूती आणि बाळ एक वर्षाचे हाेईपर्यंत हे काॅल आठवडयातून एकदा येतात. त्यांचे नंबर हे आरसीएच पाेर्टलवरून घेतले जातात.
या संदेशाद्वारे लाभार्थी महिलांना स्वत:च्या मातृभाषेत आराेग्य, पाेषण, स्वच्छता, माता व बालमृत्यूदर कमी करण्याच्या उदिष्टाने ही माहीती काॅलद्वारे देण्यात येते. त्यामुळे त्यांचे आराेग्य सुधारण्यास मदत हाेणार आहे. त्यासाठी या गर्भवतींनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील एएनएम शी संपर्क करावा, असे अवाहन कुटूंब कल्याण विभागाचे सहायक संचालक डाॅ. आमाेद गडीकर आणि आराेग्य संचालक डाॅ. नितीन अंबाडेकर यांनी केले आहे.