पुणे: काँग्रेसचे नाराज माजी नगरसेवक आबा बागूल यांची माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. माजी राज्यमंत्री रमेश बागवे तसेच ज्येष्ठ नेते, माजी आमदार उल्हास पवार हेही त्यांच्या समवेत होते. ‘पक्ष सोडून जाऊ नका, प्रचारात सक्रिय व्हा, तुमच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ’ असे थोरात यांनी बागूल यांना सांगितले.
बागूल यांनी लोकसभेसाठी पुण्यातून उमेदवारी मागितली होती, मात्र त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी काँग्रेस भवनमध्ये आंदोलन तर केलेच शिवाय काही दिवसांपूर्वी नागपुरात जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे ते काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू झाली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर माजी उपमहापौर असलेले तसेच सलग ६ वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले बागूल यांची समजूत काढण्यासाठी त्यानंतर प्रयत्न सुरू झाले.
गुरूवारी झालेल्या भेटीत बागूल यांनी थोरात तसेच बागवे व पवार यांच्याकडे तक्रारींचा पाढाच वाचला. पक्षाबरोबर अनेक वर्षे एकनिष्ठ राहिलेल्यांना पक्ष काहीही देत नाही व नुकत्याच पक्षात आलेल्यांना आमदारकी, खासदारकी यांची उमेदवारी दिली जाते असे त्यांनी सांगितले. शहराध्यक्षपद द्यावे तसेच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबरच्या जागावाटपात पर्वती व कसबा विधानसभा मतदारसंघाची अदलाबदल करावी, अशा मागण्या त्यांनी केल्या. त्यावर नक्की विचार करू, मात्र तुम्ही त्वरित पक्षाच्या प्रचारात सहभागी व्हा असे थोरात यांनी त्यांना सांगितले. एक-दोन दिवसात विचार करून सांगतो, असे बागूल यांनी त्यांना सांगितले.