प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : पूर्वीच्या काळी पुणेकरांसाठी सुख म्हणजे श्रीखंड-पुरीचे जेवण, दुपारी वामकुक्षी, संध्याकाळी लोकमान्यांचे व्याख्यान आणि रात्री बालगंधर्वांचे नाटक असे म्हटले जाते. नटश्रेष्ठ बालगंधर्व अर्थात नारायण श्रीपाद राजहंस यांची आज १३२ वी जयंती, तर बालगंधर्व रंगमंदिराचा ५२ वा वर्धापनदिन. सध्या कोरोनाच्या संकटामुळे पुण्यातील सांस्कृतिक मैफिल सुनी सुनी झाली असली तरी या दुग्धशर्करा योगाच्या निमित्ताने सांस्कृतिक क्षेत्रातून 'स्मरण'सूर उमटत आहेत.अनुराधा राजहंस म्हणाल्या, ‘‘आचार्य अत्रे यांनी म्हणून ठेवले आहे की, ब्रह्मदेवाने ठरवले तरी बालगंधर्व यांच्यासारखी व्यक्ती पुन्हा घडवणे शक्य नाही. पु ल देशपांडे म्हणायचे की, मी गेल्यानंतर माझ्या समाधीजवळ केवळ एवढेच लिहा की, ‘मी गंधर्वाना ऐकलं आहे!’ पुलंच्या भाषणामध्ये बालगंधर्वांचा उल्लेख झाला नाही, असे कधीच घडले नाही. गदिमांनी म्हटलं आहे की, 'जसा जन्मती तेज घेऊन तारा, जसा मोर घेऊन येतो पिसारा, तसा घेऊन येई कंठात गाणे, असा बालगंधर्व आता न होणे!' बालगंधर्व आजारी असताना तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री यांनी बालगंधर्वांसाठी परदेशाहून औषधे मागवली होती. मात्र औषधे येण्याच्या आधीच बालगंधर्वांचे निधन झाले. महाराष्ट्र सरकारने बालगंधर्वांचे कर्ज फेडण्याची तयारी दाखवली होती. 'माझी आर्थिक गणित चुकल्यामुळे मी कर्जबाजारी झालो आहे. माझा हा भार शासनाने का उचलावा', असे सांगत गंधर्वांनी यास नकार दिला होता.’’
-------रंगमंदिराविषयी...बालगंधर्व रंगमंदिराचे उदघाटन २६ जून १९६८ रोजी झाले. रंगमंदिराच्या तळमजल्यावर मध्यवर्ती जागेत भिंतीवर प्रख्यात चित्रकार गोपाळराव देऊस्कर यांनी काढलेली बालगंधर्वांची दोन पूर्णाकृती तैलचित्रे आहेत. एक चित्र त्यांच्या स्त्री भूमिकेतील तर दुसरे पुरुष भूमिकेतील. अनेक ठिकाणांची नाट्यगृह पाहून त्यातील सोयी सुविधांचा अभ्यास करून हे नाट्यगृह उभारले गेले. पुण्याचे नगरशासक भुजंगराव कुलकर्णी आणि सहाय्यक नगर शास्त्र अनंतराव जाधव, माधवराव तांबे, बांधकाम कंत्राटदार बी जी शिर्के अशा सर्वांचे एकत्रित परिश्रम फळास आले आणि नाट्यगृहाची योजना झाली.------रसिक मायबाप हो!अंगावर मोरपीस फिरवणारी बालगंधर्वांची ‘अन्नदाते रसिक मायबाप हो’ ही हाक आपली पिढी ऐकू शकली नाही. मात्र, विविध वस्तूंच्या स्वरूपात बालगंधर्व यांच्या स्मृती पुढील पिढीपर्यंत पोचाव्यात यासाठी मी प्रयत्न करत आहे. बालगंधर्व यांचे २०० हून अधिक फोटो, त्यांना त्या काळात मिळालेली मानपत्रे, त्यांनी सादर केलेल्या २६-२७ नाटकांच्या प्रती, नाटकात वापरलेला शेला, प्रभात फिल्म कंपनीशी 'धर्मात्मा' या चित्रपटाशी केलेला करार, त्यांच्यावर लिहिले गेलेले लेख, पोस्टाची तिकिटे, रेकॉर्ड, त्यांनी वापरलेला ग्रामोफोन, अशी पुंजी त्यात आहे. या वस्तूंची अनेक प्रदर्शने महाराष्ट्रात आजपर्यंत भरवली आहेत. या वस्तूंचे कायमस्वरूपी प्रदर्शन असणारे कलादालन असावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. - अनुराधा राजहंस------