लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे शहरात रात्रीच्यावेळी संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीमध्ये बाहेर पडणा-यांना सध्या पोलिसांकडून समजावून सांगण्यात येते आहे. मात्र तरीही नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास कारवाईचा बडगा उगारावा लागणार असल्याचे संकेत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले आहेत. यावेळी नागरिकांनी नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आल्यानंतर आता पोलीस दलासह अन्य फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. पुणे शहर पोलीस दलातील सुमारे अडीच हजार पोलीस अधिकारी व कर्मचा-यांनी आतापर्यंत लस घेतली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ससून रुग्णालयात जाऊन लस घेतली.
पोलिसांसाठी शिवाजीनगर येथील मुख्यालयातील रुग्णालयात लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे. पोलिसांनी लवकरात लवकर लस घ्यावी, यासाठी पोलीस आयुक्तालयातून पाठपुरावा केला जात आहे. पोलीस दलातील जास्तीत जास्त पोलिसांनी लस घेण्याच्या दृष्टीने त्यांच्या ड्युटीचे नियोजन करण्यात आले आहे.
शहर पोलीस दलात गेल्या टप्प्यात अनलॉकनंतर मोठ्या प्रमाणावर पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर आता पोलीस कर्मचा-यांमध्येही कोरोना प्रादुर्भाव वाढू लागला आहे. बाधितांची संख्या एक आकडी होती. गेल्या दोन दिवसांपासून ही संख्या दोन आकडी होऊ लागली आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.