पुणे : शासनाने अत्यावश्यक सेवेत घरकाम करणाऱ्या महिलांचा समावेश केला असला, तरी पुन्हा कडक लॉकडाऊन केल्यास करायचे काय? नि खायचे काय? अशी चिंता महिलांना भेडसावू लागली आहे. शहरात ‘न्यू नॉर्मल’ जगणं सुरू झाल्यानंतर हाताला पुन्हा मोठ्या मुश्कीलीने काही कामे मिळाली आहेत. मात्र लॉकडाऊनची सतत टांगती तलवार डोक्यावर असल्याने ती कामेही जातील की काय? अशी भीती वाटते....काहीही करा पण पुन्हा लॉकडाऊन नको, अन्यथा आमचा जगण्याचा प्रश्न अधिक बिकट होईल, अशी आर्त साद घरकामगार महिलांनी शासनाला घातली आहे.
लॉकडाऊनमध्ये हातावर पोट असणाऱ्या कामगारांचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच बिकट होऊ लागला आहे. यात घरकाम करणाऱ्या महिलांचा तर रोजचाच संघर्ष सुरू आहे. घरातील कुटुंब सदस्य संख्या ५ ते ६...पुरूष मंडळी बांधकाम साईटस, कंपन्या आदी ठिकाणी मजूर म्हणून कामाला होते. पण लॉकडाऊन काळात बेरोजगारी नशिबी आली आणि घरची जबाबदारी या महिलांवर पडली. गेल्या वर्षभरातील निम्मे वर्ष घरीच बसावे लागले. मालकिणींनी थोडीफार मदत केल्याने काही जणी तरल्या मात्र काहींच्या हातची कामे सुटली. जी काही कामे उरली आहेत, त्या तुटपुंज्या पगारात घर चालवायचे कसे? असा प्रश्न घरकाम करणा-या महिलांना भेडसावत आहे. असे असताना आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा लॉकडाऊनचे संकेत दिल्याने जगायचं कसं? असा सवाल या महिलांनी उपस्थित केला आहे.
-------------
घरात ५ माणसं, मुलांची शिक्षणं , वाढती महागाई यामुळे आधीच मेटाकुटीला आलो आहोत. जगण्याचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालला आहे. एक दोन कामे मुश्कीलीने मिळाली आहेत. लॉकडाऊन झाले तर ही कामे देखील जाण्याची भीती वाटते. शासनाला लॉकडाऊन करायचे असल्यास आम्हाला दर महिन्याला विशिष्ट भत्ता किंवा अनुदान शासनाने द्यायला हवं.
-शोभा चिंचणे, घर कामगार
------------------------------------------------------------------------
लॉकडाऊन काळात नवऱ्याची नोकरी गेली. किमान दोघे कमवत होतो म्हणून संसाराला थोडाफार हातभार लागत होता. पण आता माझ्या एकटीवर संसाराची जबाबदारी येऊन पडली आहे. नवऱ्याला अजूनही काम मिळालेले नाही. दिवसाला ५ ते ६ घरची कामे करते. पूर्वीची दोन कामे सुटली. जे काही तुटपुंजे मिळते त्यातच घर चालवावे लागते. शासनाने पुन्हा लॉकडाऊन करू नये एवढीच विनंती आहे.
- त्रिशला कुंभारे, घर कामगार
--------------------------------------------------------------
मी घरोघरी जाऊन स्वयंपाकाची कामे करते. सकाळी ७ वाजता घराबाहेर पडते आणि संध्याकाळी ४ वाजता माझा दिवस संपतो. नवरा फारसे कमवत नाही आणि घराकडे पण लक्ष देत नाही. त्यामुळे मला काम करणे भाग आहे. पण लॉकडाऊनच्या टांगत्या तलावारीमुळे कामे जायची भीती वाटते.
- राणी हसबनीस, स्वयंपाकी
--------------------
चौकट
* शहरातील घरेलू कामगार महिलांची संख्या ६० ते ७० हजार
* घरेलू कामगार महिलेला एका घरातून धुणं, भांडी, झाडू पोछा अशा एकत्रित कामांचे अंदाजे ८०० ते १००० रूपये तर स्वतंत्र कामाचे ३०० ते ५०० रूपये मिळतात.
* स्वयंपाकासाठी १२०० ते १५०० रूपये घेतले जातात.
* एक घरेलू कामगार महिला दिवसाला पाच ते सहा घरांमध्ये काम करते. मात्र घरातील माणसे आणि कामाचा बोझा यानुसार तिला रक्कम दिली जाते.
---------------------------------
,