चाकण : ग्रामपंचायत सार्वभौम संस्था असून सरपंच हा सर्वात मोठा लोकप्रतिनिधी आहे. सरपंचांनी आपले अधिकार वापरताना सेवावृत्तीने काम केले पाहिजे. काळ आणि प्रसंग बघून निर्णय घेतले पाहिजेत. केवळ लोकांना बरे वाटेल असे निर्णय न घेता काही धाडसी निर्णय घेऊन गावाला शिस्त लावावी असा सल्ला आदर्श गाव पाटोदाचे शिल्पकार माजी सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी दिला आहे.
खेड तालुक्यात वराळे येथे जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी पिंपरी पाईट जिल्हा परिषद गटातील सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांच्यासाठी आयोजित केलेल्या एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते.
'देश महासत्ता करण्यासाठी गावे स्वच्छ समृद्ध आणि स्वयंपूर्ण केले पाहिजे. तसेच आर्थिक नियोजन बारकाईने करावे. नागरिकांना उत्तम सुविधा झाली तर नागरिक कर द्यायला मागे राहत नाही. हे आम्ही आमच्या पाटोदा गावी सिद्ध केले आहे. असेही पेरे पाटील यांनी सांगितले.'
यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, पंचायत समिती सदस्य अमोल पवार, वराळेचे सरपंच दिनेश लांडगे, कोरेगावचे उपसरपंच रोहित डावरे पाटील यांच्यासह खेड तालुक्यातील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य उपस्थित होते.