पुणे : औरंगाबाद येथे अवघ्या काही तासातच राज ठाकरेंची सभा सुरु होणार आहे. औरंगाबाद पोलीस प्रशासनाने काही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी सभेला नियम व अटी घालून दिल्या आहेत. तसेच शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर शहरात बऱ्याच ठिकाणी सिसिटीव्ही बसवण्यात आले आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सुद्धा सभा घेणाऱ्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सभा घेणाऱ्यांनी अटी व शर्थीचे पालन करावे असे सांगितले आहे. पुण्यातल्या पोलीस मैदानावर महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी पवार उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांबरोबर संवाद साधला.
अजित पवार म्हणाले, राज्यात आज सभा घेणाऱ्यांनी भान ठेवूनच वक्तव्य करावीत. महाराष्ट्रात वातावरण कुठेही खराब होणार नाही, हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. कोणी असो आपले विचार मांडताना समाजात तेढ निर्माण होईल अथवा कोणाच्या भावना भडकवल्या जातील असं काही बोलू नये. राज्यातील वातावरण खराब होईल, अशी वक्तव्य शक्यतो टाळावीत.
अटींचं संबंधितांनी पालन करा
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सभा आयोजित केल्या असतील. पण त्या भागातील पोलीस प्रशासनाने सभेला परवानगी देत असतात. तसंच औरंगाबाद इथल्या सभेला परवानगी देताना काही अटी घालून दिल्या आहेत. प्रत्येकाला आपले विचार मांडायचा अधिकार आहे. पण कोणाच्या भावना भडकावल्या जातील असे काही बोलू नये. राज्यात वातावरण चांगलं राहील याची सर्वानीच काळजी घ्यावी असे आवाहन पवार यांनी यावेळी केले आहे.