पुणे : मेट्रोच्या स्टेशनच्या कामासाठी कामगार पुतळा येथील झोपडपट्टीचे स्थलांतर करण्याचे काम सध्या सुरु आहे. या ठिकाणच्या बहुतांश ठिकाणचे बहुतांश झोपडीधारक दुसरीकडे राहण्यास गेले आहेत. काही जण मात्र अजूनही तेथेच आहेत. तेथील घरे पाडत असताना अधिकाऱ्यांना विरोध करुन अंगावर धावून जाऊन अॅट्रोसिटीची तक्रार देऊ, अशी धमकी देणाऱ्या दोघांवर शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
महेंद्र मच्छिंद्र कांबळे (वय ४६) आणि गणेश मच्छिंद्र कांबळे (वय ४४) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.याप्रकरणी महापालिकेचे कनिष्ठ अभियंता अभिजित टेंभुर्णे यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामगार पुतळा येथील महेंद्र कांबळे यांचे घर पाडण्याचे काम सुरु असताना दोघे जण तेथे आले. आमच्या घरावर कारवाई करायची नाही. आम्ही येथूून जाणार नाही. आम्हाला घराबाहेर काढू नका, तुम्ही आमच्यावर अन्याय करीत आहात, असे म्हणून तुम्हाला सोडणार नाही, असे म्हणत अंगावर धावत येऊन तुमच्याविरुद्ध अॅट्रोसिटीप्रमाणे तक्रारी देऊ, असे म्हणून आमच्या जिवाचे बरेवाईट करुन घेऊ, अशी धमकी दिली. शिवीगाळ करुन घरातच बसून राहून घरातून बाहेर निघण्यास विरोध करुन अंगावर धावत येऊन सरकारी कामात अडथळा आणला आहे, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.