पुणे : सध्या लसीकरण हाच कोरोनाची साथ नियंत्रणाचा एकमेव पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळेच टप्प्याटप्प्याने १८ वर्षांवरील सर्वच नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मात्र, लसींचा तुटवडा ही सध्याची मोठा अडचण आहे. त्यामुळे पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना आपल्याला दुसरा डोस कधी मिळणार, याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, दुसरा डोस कधी घ्यावा, याबाबत शास्त्रज्ञांनी स्पष्टीकरण दिले असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
लसीच्या पहिल्या डोसनंतर दोन ते चार आठवड्यांनी शरीरात अँटिबॉडी विकसित व्हायला सुरुवात होते. दुसरा डोस ही शरीरातील अँटिबॉडी विकसित करण्याची प्रक्रिया अधिक वेगवान करतो. त्यामुळे दुसऱ्या डोसला ''बुस्टर डोस'' असे म्हटले जाते. कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा डोस हा तीन महिन्यांपर्यंत घेता येतो. कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस चार आठवड्यांनी घेता येतो. यामध्ये दोन आठवडे प्रलंब झाला तरी अपाय होत नाही, अशी माहिती जनरल फिजिशियन डॉ. अनिकेत महाजन यांनी दिली.
-----
चौकट
पहिला डोस झालेले आरोग्यसेवक - १४२५७८
दुसरा डोस झालेले आरोग्यसेवक - ७७४२५
पहिला डोस झालेले फ्रन्टलाइन वर्कस- २०५१५८
दुसरा डोस झालेले फ्रन्टलाइन वर्कर्स - ६३४२६
पहिला डोस झालेले सामान्य नागरिक - १६४३९२८
दुसरा डोस झालेले सामान्य नागरिक - २५८०८३
----
डोसला उशीर झाला तरी घाबरू नका
शासनाच्या निर्देशानुसार, कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस ६ ते ८ आठवड्यांनी तर कोव्हकसिन लसीचा दुसरा डोस ४ आठवड्यांनी घेता येतो. पहिल्या डोसनंतर शरीरात अँटिबॉडी तयार होऊ लागतात. दुसरा डोस हा बुस्टर डोस असतो. त्यामुळे तो घेण्यास थोडा प्रलंब झाला तरी रोगप्रतिकारकशक्ती कमी होत नाही. त्यामुळे डोसला उशीर झाला म्हणून घाबरून जाऊ नये.
- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका