पुणे : कोरोनाच्या संशयित आणि बाधित रुग्णांवरील उपचारानंतर तयार झालेला वैद्यकीय कचरा विमानतळाजवळ असलेल्या दोन बिल्डरांच्या जागेत जाळण्यात येत असल्याचे समोर आले आहे. त्याविरोधात स्थानिकांनी न्यायालयात धाव घेतली. नागरिकांच्या तक्रारीवर त्या दोन बांधकाम व्यावसायिकांनी कचरा जाळून प्रदूषण आणि शेजारील जमिनीवर अतिक्रमण करू नये, असा अंतरिम आदेश दिवाणी न्यायालयाने दिला आहे. लोहगाव येथील नंदकिशोर, अंकुश आणि विकास तुकाराम बिडकर यांनी 'स्काय वन कॉपोर्रेट पार्क लिमिटेड' आणि 'ब्लू हेवन इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड' यांच्याविरोधात दावा दाखल केला होता. बिडकर बंधूंची लोहगाव विमानतळाजवळ जागा असून त्यांच्याच बाजूला बिल्डरांचा प्लॉट आहे. बिल्डरांनी आमच्या जागेत अतिक्रमण केले, अशी बिडकरांची तक्रार असून त्यावरून त्यांच्यात वाद सुरू आहे. दरम्यान गेल्या पंधरा दिवसांपासून बिल्डरांच्या जागेत मात्र वादींच्या जमिनीला लागून कोरोनाचा कचरा जाळण्यात येत आहे. त्यामुळे प्रदूषण होत असून परिसरात राहणा-या नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. तसेच संबंधित बिल्डरांचे आमच्या जागेत अतिक्रमण सुरूच आहे, असा दावा बिडकर बंधूंनी अॅड. हरीश कुंभार, अॅड. राकेश उमराणी आणि अॅड. नितीश गायकवाड यांच्यामार्फत दावा केला होता. तक्रारदारांनी याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिले होते. मात्र पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. हा दिवाणी दावा असल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. प्रतिवादी यांनी यापूर्वी वादी यांच्या जागेत अतिक्रमण केले असून आत्तादेखील अतिक्रमण सुरूच आहेत. त्यास विरोध केल्याने कचरा जाळण्याचा प्रकार सुरू आहे. येथील जागेच्या सीमा यापूर्वीच स्पष्ट करण्यात आल्या आहेत, असा युक्तिवाद अॅड. उमराणी आणि अॅड. कुंभार यांनी केला. प्रतिवादी वादी यांच्या जागेत काय करणार आहेत, याचे फोटो अॅड. गायकवाड यांनी न्यायालयात दाखवले. या सर्वांचा विचार करून न्यायालयाने अंतरिम आदेश दिले आहेत. लॉकडाऊन असल्याचा गैरफायदा घेत प्रतिवादी तक्रारदारांच्या जागेत अतिक्रमण व कोरोनाचा कचरा जाळून प्रदूषण करीत आहेत, असे न्यायालयाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित बिल्डरांनी बिडकर यांच्या जागेत अतिक्रमण न करता कोरोनाचा कचरा जाळू नये, असा आदेश न्यायालयाने दिले आहेत.
कोरोनाचा कचरा जाळून प्रदूषण करू नका, दिवाणी न्यायालयाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 6:38 PM
कोविड रुग्णांवरील उपचाराचा वैद्यकीय कचरा दोन बिल्डरांच्या जागेत जाळण्यात येत असल्याचे समोर...
ठळक मुद्देस्थानिकांची न्यायालयात धाव;