लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भामा आसखेडचे २.६ टीएमसी पाणी पुणे शहराला नव्याने मिळत असल्याने, खडकवासला प्रकल्पातून पुणे शहराला मिळणारे तितकेच पाणी कमी करावे, या जलसंपदा विभागाच्या प्रस्तावाला विरोध असून, पुणे शहराचे पाणी कमी करु नये, अशी भूमिका महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मांडली आहे.
पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत महापौर मोहोळ यांनी भूमिका मांडली. मोहोळ म्हणाले, पुणे शहराची लोकसंख्या, समाविष्ट गावांच्या पाण्याची गरज आणि भविष्यातील एकूणच गरज लक्षात घेता पुणे शहराची पाणीकपात करणे चुकीची आहे. २००१ साली वार्षिक ११.५० टीएमसी पाण्याचा करार झाला होता. मात्र त्यानंतर पाणी वाढवून द्यावे यासाठी सातत्याने प्रयत्न झाले. मात्र अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही. त्याउलट पाणीकपात करण्याची पुणेकरांच्या विरोधातील भूमिका जलसंपदा विभागाने घेतली आहे. सद्यस्थितीत पुणे शहराला १८.५ टीएमसीची आवश्यकता आहे.
पुणे महापालिकेचा गळती कमी करण्याचा प्रयत्न असून, २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेमुळे ही पाणीगळती कमी होणार आहे. शिवाय जायका प्रकल्पाच्या माध्यमातून सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते पाणी सिंचनासाठी वापरता येणार आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने आपली भूमिका मागे घ्यावी, असेही मोहोळ म्हणाले.