'बाबांनो कोरोनाला एवढं हलकं घेऊ नका', अजितदादांची मास्क न घालणाऱ्यांना विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 03:08 PM2022-03-13T15:08:39+5:302022-03-13T15:08:50+5:30
पुण्यात आज ३१ ठिकाणच्या कार्यक्रमांना अजित पवार भेटी देणार
पुणे : पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विविध कामांचे उदघाटन होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तब्बल ३१ ठिकाणच्या कार्यक्रमांना अजित पवार भेटी देणार आहेत. यावेळी कात्रज येथील कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मास्क घालण्याची विनंती अजित पवार यांनी केली आहे. बाबांनो कोरोनाला एवढं हलकं घेऊ नका, चीनमध्ये अजूनही हा वेगाने पसरत असल्याचं ते यावेळी म्हणाले आहेत. अजित पवार भाषण करताना असं म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
चीनमध्ये काल परवा लॉक डाऊन करण्याची वेळ आली आहे. आपल्याकडे मागील वर्षी कोरोनाचे संकट असताना देखील विकास कामांना गती देण्याचे काम सुरु होते. पण आता कोरोना कमी झालाय पण गेलेला नाही. इथं तर पठ्ठ्यानी मास्कच काढून टाकलाय. असं चालणार नाही. असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
कोरोनात जीवा-भावाची माणसं सोडून गेलीत, त्यामुळे काळजी घ्या
आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये तेव्हाच मी मास्क काढतो. तुम्ही मला दोन वर्षात एकदा तरी विनामास्क पाहिले का? फक्त जेवताना आणि पाणी पिताना मास्क झोपताना तेवढा मास्क काढतो. अर्थसंकल्प सांगत असताना अनेक जण म्हणाले की, दादा मास्क काढा, तर मी म्हणालो की, माझा आवाज खणखणीत आहे. गमतीचा भाग जाऊ द्या, सर्वांनी मास्क वापरला पाहिजे, आपण सर्वांनी कोरोना काळात मास्क न घालण्याची आणि काळजी न घेण्याची खूप मोठी किंमत मोजली आहे. अनेक जीवा-भावाची माणसं सोडून गेलीत, त्यामुळे काळजी घ्या”, असं अजित पवार म्हणाले.
पंतप्रधान मोदींकडे मागणी करणार
उद्धव ठाकरे यांनी माझ्या सारख्या कार्यकर्त्यांवर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली आहे. ही जबाबदारी कशा पद्धतीने पार पाडता येईल, हा माझा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शहरातील वाहतुकीचा प्रश्न मिटवण्यासाठी सर्व भागात मेट्रोचं जाळं पसरले पाहिजे, यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाईल. मात्र, यासाठी केंद्राची देखील मदत आवश्यक असून याबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली आहे,” असं त्यांनी सागितलं.