पुणे : महापरीक्षा पाेर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये अनेक त्रृटी समाेर येत असल्याने महापरीक्षा पाेर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा रद्द करुन पुन्हा एमपीएससीने अाॅफलाईन पद्धतीने परीक्षा घ्याव्यात अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य परीक्षेवर बहीष्कार टाकू असा इशारा परीक्षार्थींकडून देण्यात अाला अाहे.
नुकताच नगरपरिषदेची वर्ग तीनची परीक्षा महापरिक्षा पाेर्टलद्वारे घेण्यात अाली. या परीक्षेवेळी अनेक गैरप्रकार समाेर अाल्याचे परीक्षार्थींचे म्हणणे अाहे. त्यामुळे नगरपरिषदेची मुख्य परीक्षा तसेच सहाय्यक गुप्तवार्ता अधिकारी पदाची परीक्षा ही महापरीक्षा पाेर्टलद्वारे न घेता एमपीएससी ने अाॅफलाईन पद्धतीने घ्यावी अशी परीक्षार्थींची मागणी अाहे. याविषयी बाेलताना किरण निंभाेरे हा परीक्षार्थी म्हणाला, 18 ते 22 मे दरम्यान नगरपरिषदेची वर्ग तीनची प्रिलिम परीक्षा महापरीक्षा पाेर्टलद्वारे अाॅनलाईन पद्धतीने घेण्यात अाली. यावेळी अनेक गैरप्रकार परीक्षार्थींना अाढळून अाले. या परीक्षेदरम्यान परीक्षार्थींना कुठेही बसविण्यात अाले हाेते. तसेच काहींना कॅलक्युलेटर वापरण्याची परवानगी सुद्धा देण्यात अाली हाेती. काही परीक्षा केंद्रांवर बायाेमॅट्रीक पद्धतीने हजेरी घेतली तर काही ठिकाणी या पद्धतीने घेतली गेली नाही. अनेक ठिकाणी तर परीक्षार्थींनी एकत्र बसून पेपर दिले अाहेत. त्यातच चार दिवस परीक्षा चालल्याने अनेक प्रश्न हे पुन्हा पुन्हा विचारण्यात अाले हाेते. त्यामुळे या परीक्षेची गुणवत्ता ढासळत असल्याचे दिसून येत अाहे. महापरीक्षा पाेर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये अनेक त्रृटी समाेर येत असल्या तरी सहाय्यक गुप्तवार्ता अधिकारी पदाची परीक्षा याच पद्धतीने घेण्यात येणार असल्याची जाहिरात काढण्यात अाली अाहे. त्यामुळे अाम्हा सर्व विद्यार्थ्यांची मागणी अाहे की या परीक्षा महापरीक्षा पाेर्टलद्वारे न घेता एमपीएससीने अाॅफलाईन पद्धतीने घ्याव्यात अन्यथा राज्यातील परीक्षार्थी नगरपरिषदेच्या मुख्य परीक्षेवर बहिष्कार टाकतील. तरीही सरकारने अामच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास महापरीक्षा पाेर्टलद्वारे घेण्यात येणारी काेणतीही परीक्षा काेणत्याही केंद्रावर हाेऊ न देण्याचे अाश्वासन विविध विद्यार्थी संघटनांनी अाम्हाला दिले अाहे.
दरम्यान या संदर्भात एमपीएससीचे अध्यक्ष प्रमुख व्ही. एन. माेरे यांच्याशी फाेनवरुन संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ताे हाेऊ शकला नाही.