पुणे : माझ्या मतदारसंघात आले म्हणजे त्यांना काहीतरी बोलणं भाग आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना जास्त सिरियसली घेऊ नका असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पुण्यात व्यक्त केले. काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत थोरात बोलत होते़. बुधवारी थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारासाठी उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. त्यावेळी त्यांनी 'थोरात यांना आता घरी बसवण्याची वेळ आली आहे. ते थोरात तर आम्ही जोरात' असेही ते म्हणाले. त्यावर उत्तर देताना थोरात म्हणाले की, 'मतदारसंघात आल्यावर त्यांना काहीतरी बोलणे भाग आहे. तुम्ही काय त्यांना सिरीयस घेऊ नका'.
ते म्हणाले, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झालेली नसून, विधानसभा निवडणुकीला आम्ही दोन्ही पक्ष आघाडी म्हणून सामोरे जात आहोत़. निवडणुक प्रचाराला आत्ताच कुठे सुरूवात झाली आहे़ आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराला काँग्रेसचे राष्ट्रीय पातळीवर सर्व नेते येणार असून, या निवडणुकीत आम्ही १६० पेक्षा अधिक जागा मिळवून विजयी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला़. राज्य सरकारने पुर परिस्थितीच्या काळात अतिशय निराशाजनक काम केले असून, केंद्र सरकारकडून ६ हजार ८०० कोटी रूपयांची मदत मिळाली असे सांगितले आहे़, मात्र यापैकी एक पैसाही राज्याला केंद्राने दिलेला नाही़. निवडणुकीच्या धामधुमीत व भाजपातील महाभरतीत सरकार पुरग्रस्तांना विसरले आहे़.
ओबीसी समाजाकरिता मोठे काम केंद्र सरकारने केल्याचे गृहमंत्री अमित शहा सांगत आहेत, परंतू कोणते काम केले याचा ते उल्लेख करीत नाहीत़. पुणे शहर हे स्मार्ट सिटी म्हणून घोषित केले. परंतू एकही प्रकल्प त्यांनी गेल्या पाच वर्षात पूर्ण केलेला नाही़, अनेक प्रकल्प रेंगाळलेले आहेत़ राज्य सरकारचे हे अपयश घेऊनच आम्ही जनतेसमोर जाणार असल्याचे थोरात यांनी सांगितले़.