लोकतम न्यूज नेटवर्कमंचर (जि. पुणे) : सत्तेतला वाटेकरी हा सर्वात मोठा शत्रू असतो. शत्रू नको असेल तर विधानसभेला १५५ जागा निवडून आणण्यासाठी आपल्याला एकमेकांची गरज आहे. आज राज्यात वेगळी परिस्थिती असली तरी शिवसेनेने शस्त्रे टाकली आहेत, असे समजू नका. शिवसैनिक लढवय्ये असून पैशाने दहशत निर्माण कराल तर आमच्याकडे हिंमत आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शनिवारी केले.
लांडेवाडी येथे शिवसैनिकांच्या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून राऊत बोलत होेते. ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेनेला वारंवार अपमानित केले. त्या वेदनेतून उडालेल्या ठिणगीमुळे मुख्यमंत्रिपद मिळाले. सरकार टिकवताना शिवसेना पक्षाला ताकद मिळाली पाहिजे. फाटक्या शिवसैनिकाने अनेक धनाढ्य लोकांना पराभूत केले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जात-पात न पाहता शिवसैनिकाला मोठे केले. राज्यात वेगळी परिस्थिती असताना आम्ही शस्त्र टाकली असे समजू नका. शिवसैनिक लढवय्ये आहेत.महाराष्ट्रात तीन पक्ष सत्तेत असले तरी शिवसेना हे स्वतंत्र बेट तसेच महासत्ता आहे. ते विलीन करता येणार नाही. शिवसेनेचा सूर्य कधी मावळला नाही. आपला जन्म लढण्यासाठी झाला आहे. पुढील काळात होणाऱ्या निवडणुकीसाठी संघटना बांधणीकडे लक्ष द्या. समोर कोण ताकदीचा आहे हे न पाहता सत्तेचे आपण वाटेकरी आहोत. सत्तेला टेकू शिवसेनेचा आहे. ही जाणीव होऊ द्या. पैशाने निवडणूक जिंकता येत असती तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ५० खासदार हवे होते, असे राऊत म्हणाले.
राज्यपाल केंद्राचे पॉलिटिकल एजंट राज्यपाल हे केंद्राचे पॉलिटिकल एजंट असतात. त्यांची नेमणूक राजकीय असते. त्यामुळे त्यांची भूमिका तटस्थ नसते. आपले राज्यपाल हे केंद्रात मंत्री होते. ते भाजपचे सदस्य होते तसेच संघ प्रचारक होते. त्यामुळे भाजपला जे हवे आहे तेच ते करतील. ब्रिटिश काळातच राज्यपालांना ‘पाॅलिटिकल ॲडव्हायझर’ ही उपाधी दिली गेली आहे. राज्यात काय घडत आहे त्याची माहिती देण्याचे काम त्याकाळी राज्यपाल करत होते, असे राऊत यांनी राजगुरुनगर येथे पत्रकार परिषदेत सांगितले.