लोकतम न्यूज नेटवर्क
मंचर : सत्तेतला वाटेकरी हा सर्वांत मोठा शत्रू असतो. शत्रू नको असेल तर विधानसभेला या भागासह १५५ जागा निवडून आणण्यासाठी आपल्याला एकमेकांची गरज आहे. आज राज्यात वेगळी परिस्थिती असली तरी शिवसेनेने शस्त्र टाकली आहे, असे समजू नका. शिवसैनिक लढवय्ये असून पैशाने दहशत निर्माण कराल तर आमच्याकडे हिम्मत आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज केले.
आंबेगाव तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन लांडेवाडी येथे करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राऊत बोलत होेते. यावेळी शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, राजाराम बाणखेले, सुभाष पोकळे, तानाजी शेवाळे, अशोक बाजारे यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर जिल्हाप्रमुख शरद सोनवणे, उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, अविनाश रहाणे, दीपमाला बढे, श्रद्धा कदम, माऊली खंडागळे, सरपंच अंकुश लांडे, किरण राजगुरू, सागर काजळे आदी उपस्थित होते.
राऊत म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेनेला वारंवार अपमानित केले. त्या वेदनेतून उडालेल्या ठिणगीमुळे मुख्यमंत्रिपद आपल्याला मिळाले. अपमानाची सल होती. त्यातून सरकार स्थापन झाले. सरकार टिकवताना शिवसेना पक्षाला ताकद मिळाली पाहिजे. फाटक्या शिवसैनिकाने अनेक धनाढ्य लोकांना पराभूत केले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जात-पात न पाहता शिवसैनिकाला मोठे केले. पैशाने निवडणूक जिंकता येत असती तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ५० खासदार हवे होते. राज्यात वेगळी परिस्थिती असताना आम्ही शस्त्र टाकली असे समजू नका. शिवसैनिक लढवय्ये आहेत. महाराष्ट्रात तीन पक्ष सत्तेत असलेस तरी शिवसेना हे स्वतंत्र बेट तसेच महासत्ता आहे. ते विलीन करता येणार नाही. शिवसेनेचा सूर्य कधी मावळला नाही. आपला जन्म लढण्यासाठी झाला आहे. पुढील काळात होणाऱ्या निवडणुकीसाठी संघटना बांधणीकडे लक्ष द्या. समोर कोण ताकदीचा आहे हे न पाहता सत्तेचे आपण वाटेकरी आहोत. सत्तेला टेकू शिवसेनेचा आहे. ही जाणीव होऊ द्या.
शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, आगामी काळात होणाऱ्या निवडणुका लढण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज राहावे. सहकारात भक्कम जाळे उभे करायचे आहे. मी जरी खासदार नसलो तरी तेवढीच ताकत माझी सरकारदरबारी आहे. एखादा प्रश्न मांडल्यास मुख्यमंत्री तातडीने दखल घेतात. पद नसले तरी फारसा फरक पडत नाही. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर लढताना सामना बरोबरीत सुटतो. त्यामुळे अजून ताकद वाढवायची आहे. पुढील काळात तालुक्यात आघाडी झाली तर ठीक, नाहीतर ताकदीवर लढू. कर्नाटक उच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला काही अटी-शर्तीवर परवानगी दिली आहे. त्या निकालात २०१३ मध्ये जी केस मी जिंकलो होतो तिचा दाखला देण्यात आला आहे. निकालात माझ्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. असे त्यांनी नमूद केले. प्रास्ताविक रवींद्र करंजखेले यांनी केले. सूत्रसंचालन सुरेश घुले तर आभार देविदास दरेकर यांनी मानले.
चौकट
पुढच्या वेळी बैलगाडा शर्यतींचा विषय संपला असेल
बैलगाडा शर्यतीबाबत पक्षाला निर्णय घ्यावा लागेल. बैलगाडासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली जाईल. पुढे या भागात येईल त्यावेळी बैलगाडा विषय संपलेला असेल.
- संजय राऊत, खासदार
फोटोखाली: मंचर येथील शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना शिवसेना नेते संजय राऊत.