पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अनेक भाषांचा एकत्रित विचार स्कूल ऑफ इंडियन लॅग्वेज मध्ये जरूर करावा. मात्र, इतर भाषांच्या दावणीला मराठीची प्रतिष्ठा आणि पवित्र बांधू नये, मराठी भाषेच्या समृद्धतेचा अभ्यास करण्यासाठी विविध संशोधन प्रकल्प हाती घ्यावेत, अशा प्रतिक्रिया अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ‘स्कूल ऑफ इंडियन लॅग्वेज’ आणि ‘स्कूल ऑफ इंग्लिश अँड फॉरेन लॅग्वेज’ असे दोन संकुल तयार केले आहेत. नॅक समितीने केलेल्या शिफारशीनुसार विद्यापीठात केवळ भाषाच नाही तर इतर सर्व विभागांचे संकुलामध्ये रूपांतर केले आहे. काळानुरूप आवश्यक बदल स्वीकारलेत पाहिजेत. परंतु, विद्यापीठाच्या स्थापनेच्या इतिहासाचा विसर होता कामा नये, असे मत माजी संमेलनाध्यक्षांकडून व्यक्त केले जात आहे.
माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, मराठी विभागाच्या माध्यमातून भाषेच्या विकासासाठी विविध संशोधन प्रकल्प हाती घेण्याची गरज आहे. भाषा संशोधन करण्यासाठी स्वतंत्र प्राध्यापकांची किंवा रिसर्च फेलो म्हणून विद्यार्थ्यांचे नियुक्ती करायला हवी. त्यासाठी विभागाला अधिकाधिक निधी देणे गरजेचे आहे.
--
पुणे विद्यापीठाची स्थापना मराठी भाषा व संस्कृतीच्या अधिवृद्धीसाठी झाली. हा इतिहास व ध्येयवाद धाब्यावर बसून कुठलीही संकल्पना अस्तित्वात आणणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मराठी भाषेविरोधात द्रोह केल्यासारखे होईल. बदलत्या काळानुरूप सर्व भाषा भगिनींचे एकत्रीत संकुल जरूर असावे. पण अनेक भाषांपैकी एक ‘मराठी भाषा’ ही संकल्पना महाराष्ट्राला अन्यायकारक आहे. तसेच विद्यापीठाच्या ध्येयला काळिमा फासणारी आहे. त्यामुळे मराठीसाठी स्वतंत्र संकुल हवे.
- श्रीपाल सबनीस, माजी, संमेलनाध्यक्ष