नसरापूर : पुणे-सातारा महामार्गावरील धांगवडी ( ता. भोर) येथील आडबल सिद्धनाथ मंदिरासमोरील उड्डाणपुलावर डांबरी रस्त्याला मोठमोठे खड्डे पडल्यामुळे आणि रस्त्यावरील खड्ड्यांच्या धारदार कडांमुळे अनेक चारचाकी, दुचाकी वाहनांचे रात्री अपरात्री खड्डा न कळल्यामुळे टायर फुटून अपघात होत आहेत. त्यामुळे महामार्गावरील या उड्डाणपुलावर रस्त्याच्या कडेला ३० ते ४० वाहनांचे टायर फुटल्यामुळे आणि जवळ कुठेही टायर दुरुस्ती अथवा बदलण्याची व्यवस्था नसल्याने अनेकांचे हाल होत आहेत.
धांगवडी ( ता. भोर) येथील आडबल सिद्धनाथ मंदिरासमोरील उड्डाणपुलावरील या मुख्य रस्त्याची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने या रस्त्यावरून जाणे म्हणजे जीव मुठीत धरून जाण्यासारखेच आहे. वाहनांचे नुकसान आणि वाढणारा वेळ यामुळे या रस्त्याने प्रवास नको रे बाबा असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. प्रशासनाला मात्र याचे काहीही सोयरसुतक नाही. धांगवडी उड्डाणपुलाच्या रस्त्यावरील हे खड्डे कधी बुजवणार की मोठा अपघात होण्याची वाट पाहिली जाते आहे अशी टीका करीत अनेक प्रवासी या रस्त्यावरून आता इकडून यायचेच नाही अशी उपरोधिक टोमणे मारत आहेत. उड्डाणपुलावरील या खड्ड्यांमुळे दुचाकी, चारचाकी चालकांना रस्त्याने ये - जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी प्रवास करताना दुचाकीधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. यामुळे नव्या वाहनांचा अक्षरश: बोजवारा उडाला आहे. पुणे - सातारा - कोल्हापूर - महाबळेश्वर या रस्त्याला नेहमी रहदारी असते. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे दुचाकीस्वारांना रात्रीच्या वेळी अंदाज न आल्याने दररोज अपघात होत आहेत. येथील नागरिकांचा दररोजचा या रस्त्याने राबता असल्याने पाठीच्या मणक्यांचे आजाराचे दुखणे वाढले आहे.
खराब रस्त्याअभावी वाहने पंक्चर होणे, टायर फुटणे, पाटे तुटणे अशा या तक्रारींमुळे चारचाकी वाहनधारक अक्षरश: धास्तावले आहेत. त्यातच महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले. तरीही नाईलाजाने याच महामार्गाचा वापर करतात. रस्त्याच्या दुरुस्तीअभावी शेतीमाल नेणेही अवघड झाले आहे. या रस्त्याची तातडीने दखल घेत दुरूस्ती करावी अशी मागणी येथील काळूराम महांगरे आणि प्रवासी, शेतकरी वर्ग, विद्यार्थी, नोकरवर्ग, कामगार आदींनी केली आहे.