पुणे : नाटकासाठी रंगमंच, सांस्कृतिक केंद्रे तयार होणे आवश्यक आहेत. ही केंद्रे स्वतंत्र असतील तर बरे. कारण सरकारच्या नियंत्रणात ही सांस्कृतिक केंद्र आली की, त्यांची वाट लागते, अशा भावना ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी व्यक्त केल्या. महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या वतीने टिळक रोडवरील भागात ‘श्रीराम लागू रंगावकाश’ रंगमंचाची स्थापना करण्यात आली. त्याचा शुभारंभ रावल यांच्या हस्ते झाला. हिराबाग येथील महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या रंगालय इमारतीमध्ये हा रंगावकाश साकारला जात आहे. या वेळी ज्येष्ठ अभिनेेते डॉ. मोहन आगाशे, दीपा लागू आदी उपस्थित होते.
श्रीराम लागू रंगावकाश हा रंगमंच आधुनिक असणार आहे. त्यात तीन प्रकारे नाटक सादर करता येईल. त्यामुळे लेखक, अभिनेते, दिग्दर्शक अशा सर्वांना आपली कला वेगळ्या प्रकारे दाखवता येणार आहे.डॉ. आगाशे म्हणाले,‘‘एखाद्याला कला सादर करायची असेल तर त्याला जागा लागते. त्या जागेत त्याने कला सादर केली तर तो थिएटर होते. ही कल्पना मांडून श्रीराम लागू रंगावकाश साकारले जात आहे. जागेचा पुरेपूर वापर करता यावा, यासाठी हे तयार केले जात आहे. पूर्वी पुण्यात दोनच थिएटर होते. आता खूप झालेत. पण थिएटरपर्यंत पोचणे अवघड होऊन बसले आहे. नवनवीन समस्या नाटक करणाऱ्याला येत आहेत. त्यावर आपण मात करून कला सादर करू.’’
मराठी रंगभूमीत असतो तर...
मराठी रंगभूमी, साहित्य, संस्कृती अतिशय संपन्न आहे. मी जर मराठी रंगभूमीवर काम कर असतो, तर आतापेक्षा मी अधिक श्रीमंत झालो असतो. कारण मराठी साहित्य अप्रतिम आहे, इथली नाटकाची परंपरा खूप जुनी आणि उत्तम आहे. इथले लेखक, साहित्य मला जाणून घेता आले असते आणि मी समृध्द झालो असतो, असे मराठीचे कौतूक रावल यांनी केले.
मराठी माणसामुळे नाटक जीवंत-
नाटकावर जीएसटी लागू केला. तेव्हा मी ते रद्द करण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण काही झाले नाही. मग मी शरद पवार यांच्याकडे गेलो. त्यांनी लगेच अरूण जेटली यांच्याशी बोलायला सांगितले. त्यांना बोलून भेटी ठरली. जेटलींना भेटायला मी व पवार साहेब गेलो. तेव्हा पंधरा-वीस मिनिटे चर्चा झाली आणि लगेच जेटली यांनी आदेश काढला. हे पाहून मी पवारांना म्हणालो, तुमच्याकडे मेजॉरिटी नसली तरी देखील हे कसं शक्य झालं.’ त्यावर पवार साहेब म्हणाले, कला आणि संस्कृती जपण्यासाठी हे करणं आवश्यक आहे.’’ हे ऐकल्यानंतर मराठी माणूस जोपर्यंत आहे, तोपर्यंत नाटक जोपासले जाईल आणि महाराष्ट्रात बहरत राहील, अशी आठवण रावल यांनी सांगितली.