पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतीगृहातील प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाची भूमिका घेवून शासनविरोधी कृत्य करू नये. तसेच राष्ट्र-विरोधी,समाज व जातीय विरोधी व राजकीय पक्षांचे उपक्रम राबवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाने दिले आहेत. तसे हमीपत्र सही करुन घेतल्यानंतरच विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश देण्यात येणार आहे.
विद्यापीठातील विविध अभ्यसाक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यापीठात प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ आवारातील विविध वसतीगृहांमध्येही प्रवेश दिला जातो. मात्र, विद्यापीठाने वसतीगृह प्रवेशाबाबत सविस्तर नियमावली प्रसिध्द केली असून सर्व विद्यार्थ्यांना या नियमावलीचे पालन करावे लागेल. त्यामुळे वसतीगृहात राहणा-या विद्यार्थ्यांना कोणत्याही राजकीय व शासन विरोधी भूमिका घेता येणार नसल्याचे या नियमावलीवरून दिसून येत आहे.
विद्यापीठाच्या नवीन नियमावलीनुसार विद्यापीठातील मुला-मुलींच्या वसतीगृहात विद्यार्थ्यांना रात्री १०.३० वाजल्यानंतर प्रवेश दिला जाणार नाही. तसेच सकाळी 6 वाजण्यापूर्वी विद्यार्थ्यांना वसतीगृहाबाहेर जाता येणार नाही. त्याचप्रमाणे मुलांच्या वसतीगृहाच्या आवारात मुलींना आणि मुलींच्या वसतीगृहात मुलांना प्रवेश बंदी असेल. विद्यार्थ्यांना वसतीगृहाबाहेर थांबण्यासाठी लेट-पास घेणे बंधनकारक असेल. त्याचप्रमाणे महिन्यातून केवळ चार वेळाच हा लेट-पास दिला जाईल. तसेच काही अपरिहार्य कारणासाठी वसतीगृहाबाहेर जाणे आवश्यक असल्यास संबंधित विद्यार्थ्याला वसतीगृह प्रमुखाची परवानगी घ्यावी लागेल.
विद्यार्थ्यांना वसतीगृहामध्ये कोणत्याही प्रकारच्या इलेक्टॉनिक उपकरणावर ऑडिओ- व्हिडिओ स्वरुपात गाणी किंवा इतर कार्यक्रम वाजवता येणार नाहीत. तसे अढळून आल्यास विद्यार्थ्याला २०० रुपये दंड करण्यात येईल. विद्यार्थ्यांना वसतीगृहाच्या आवारात कोणतीही सहल, कार्यक्रम किंवा बैठक आयोजित करता येणार नाही. तसेच विद्यापीठाच्या मेसमध्ये बाहेरचे अन्न खाता येणार नाही. वसतीगृहाच्या खोलीमध्ये कुकर, हॉट प्लेटस्, इलेक्टॉनिक शेगडी आदी वस्तू ठेवून अन्न पदार्थ तयार करता येणार नाहीत. विद्यार्थ्यांनी या नियमाचे उल्लंघन केल्यास विद्यापीठाकडून ५०० रुपये दंड केला जाईल. तसेच संबंधित विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल. विद्यार्थ्याने आपल्या खोलीमध्ये नातेवाईकांना मुक्कामासाठी ठेवल्याचे निदर्शनास आल्यास विद्यार्थ्याकडून दोन हजार रुपये दंड वसूल केला जाईल,असेही या नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे.