मी पत्र लिहू नये हीच तर तुमची हुकूमशाही! चंद्रकांत पाटलांचं अजित पवारांना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 09:42 PM2021-07-03T21:42:01+5:302021-07-03T21:54:43+5:30
राज्यातील ५४ कारखान्यांच्या विक्रीची चौकशी करण्यासंदर्भात अमित शहा यांना आज पत्र लिहणार आहे...
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नातेवाईक असलेल्या राजेंद्र घाडगे यांच्या साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या कारवाईनंतर भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. यातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिणार असून त्यात राज्यातील विक्री झालेल्या ५४ साखर कारखान्यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यात करणार आहे. पत्र लिहू नये हीच तर तुमची हुकूमशाही आहे असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांना प्रत्युत्तर देखील दिले आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले,राज्यातील ५४ कारखान्यांच्या विक्रीची चौकशी करण्यासंदर्भात अमित शहा यांना आज पत्र लिहणार आहे. साखर कारखान्यांमध्ये घोटाळा झाला असेल तर यामध्ये सर्वांची चौकशी झाली पाहिजे, मग भाजपचे नेते असले तरी त्यांचीही चौकशी झाली पाहिजे. मी पत्र लिहू नये हीच तर तुमची हुकूमशाही आहे असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले होते अजित पवार..
अजित पवार यांनी जरंडेश्वर साखर कारखान्यावर करण्यात आलेल्या कारवाईवर भाष्य करताना सुंदरबाग सोसायटीने याबाबत याचिका दाखल केली होती. त्यात १४ कारखान्यांमध्ये जरंडेश्वर कारखाना होता. माझ्याच नातेवाईकांचा तो कारखाना आहे. ईडीला चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. यापूर्वी सीआयडीने चौकशी केली त्याच्यातून काही निष्पन झालं नाही. सगळीकडून पॉझिटिव्ह गोष्टी झाल्या आहेत. त्यासंदर्भात ज्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी जायचं आहे तिकडे जाणार असून वकिलांचा सल्ला घेत अपिल करतील.
चंद्रकांत पाटलांनी याआधी पण लिहिलं होतं अमित शहांना पत्र...
उपमुख्यमंत्री अजित पवार व परिवहन मंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणारं पत्र गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलं होतं. या पत्रावरून आघाडी सरकार आणि भाजप नेत्यांमध्ये चांगलेच वाकयुद्ध रंगले होते. त्यात पुन्हा एकदा पाटील शहा यांना पत्र लिहिणार आहे. या पत्रात ते राज्यातील विक्री झालेल्या ५४ साखर कारखान्यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करणार आहे.