मिळत नाहीत म्हणून कोणत्याही बातम्या काढता का? अजित पवारांचा माध्यमांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2023 07:33 PM2023-01-15T19:33:11+5:302023-01-15T19:33:24+5:30
पुण्यात पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या समारोपावेळी महाविकास आघाडीचा एकही नेता उपस्थित नव्हता, यावर अजित पवारांना विचारण्यात आलं.
बारामती- नेते उपस्थित असायला पाहिजेत, असे कुठे म्हटले आहे. कुस्ती बघण्यासाठी देशभरातील शौकीन तेथे उपस्थित असतील तुम्हाला त्याची काय माहिती. स्पर्धेमध्ये कुठे महाविकास आघाडी आणता? स्पर्धा निकोप असली पाहिजे एवढीच अपेक्षा असते. तुम्हाला बातम्या मिळत नाहीत म्हणून कोणत्याही बातम्या काढता का, असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बारामती येथे बोलताना पत्रकारांना केला.
पुण्यात पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या समारोपावेळी महाविकास आघाडीचा एकही नेता उपस्थित राहिला नसल्याचा पत्रकारांनी पवार यांना विचारलेल्या प्रश्नावर पवार यांनीच माध्यम प्रतिनिधींना उलट सवाल केला. पवार म्हणाले, खरोखरच ज्या बातम्यात तथ्य असेल, विचार करण्यासारखी बाब असेल तर जरुर ते विचारण्याचा तुमचा अधिकार आहे. मी अजिबात तो नाकारत नाही. पण उगीचच हा का हजर राहिला नाही, तो का हजर राहिला नाही, असले प्रश्न विचारू नका.
तेथे देश पातळीवरील, राज्य पातळीवरचे कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष हजर होते. महाराष्ट्र केसरी भरविण्याचे काम ज्या माजी महापौरांनी केले, ते तेथे हजर होते. इतरही अनेक मान्यवर हजर होते. मुख्यमंत्री हजर नव्हते. पण उपमुख्यमंत्री हजर होते. माझ्या माहिती प्रमाणे पुण्यात शनिवारी मुख्यमंत्र्यांना चार-पाच कार्यक्रमांना बोलावले होते. परंतु त्यांना महत्त्वाच्या कामामुळे पुण्यातील कार्यक्रमांना उपस्थित राहता आले नसेल. त्यामुळे त्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी तेथे पाठवले असेल. सरकारमध्ये काम करत असताना असे चालत असते. बारामतीत मला एखाद्या कार्यक्रमाला जाता आले नाही तर मी पक्षातील सहकाºयांना पाठवतो, हे सगळीकडे चालते. यात फार वाईट वाटून घेण्याचे कारण नाही.