कामशेत : सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्रच्या मावळ विभागाच्या वतीने रविवारी लोणावळ्याजवळील व मुळशी तालुक्यातील कोरीगड किल्ल्यावर दुर्गसंवर्धन मोहीम राबविण्यात आली. या वेळी किल्ल्यावरील गणेश दरवाजाजवळ गडाचे व साहित्याचे पूजन करून मोहिमेची सुरुवात करण्यात आली. मातीत गाडला गेलेला एक चोर दरवाजा दुर्गसेवकांनी मातीचा ढिगारा उपसून खुला केला.लोणावळा, खंडाळ्यासह मावळात पावसाळ्यात पर्यटकांची संख्या अफाट असते. वर्षाविहाराचा आनंद घेतानाच मावळातील ऐतिहासिक व प्राचीन वास्तूंनाही पर्यटक भेट देत असतात. मावळ तालुका पर्यटनाच्या दृष्टीने गेल्या काही वर्षांत विकसित होत असून, स्थानिकांना रोजगार मिळत आहे. त्यात शिवरायांच्या गडकिल्ल्यांना पुनर्वैभव मिळवून देण्यासाठी अनेक दुर्गसंवर्धन संस्था, दुर्गसेवक, स्थानिक व पर्यटक कार्यरत आहेत. यातूनच अनेक गड-किल्ल्यांवर अनेक कामे झाली आहेत आणि होत आहेत. शिवकालातील पौड, मावळात असलेला कोराईगड हा गिरिदुर्ग आजच्या बोरघाटाच्या दक्षिणेस ३३ किलोमीटर अंतरावर आणि पुण्याच्या पश्चिमेस ६७ किलोमीटर अंतरावर आहे. पुणे व रायगड या जिल्ह्यांच्या सीमेवर तो आहे. शिवपूर्व काळापासून या किल्ल्याला फार महत्त्व प्राप्त झाले असून, पौड-मावळातील आंबे अथवा आंबवणी घाटावर लक्ष ठेवण्यासाठी हा महत्त्वाचा भाग मानला जात असे. .............प्रतिष्ठानच्या या मोहिमेदरम्यान किल्ल्याच्या मागच्या म्हणजेच सहारा सिटीच्या बाजूला असणाऱ्या बुरुजाच्या खालच्या टप्प्यात असलेल्या तीन चोर दरवाजांपैकी एक दरवाजा जो पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्यात दिसेनासा झाला होता तो मोकळा करण्यात आला. या तीन दरवाजांपैकी एक दरवाजा पूर्वीपासून मोकळा आहे. तर दोन दरवाजे हे पूर्णपणे बुजले गेले होते. त्यातील एक दरवाजा या मोहिमेत मोकळा करण्यात आता. या मोहिमेत विविध ठिकाणचे दुर्गसेवक सहभागी झाले होते.
मुळशी तालुक्यातील कोराईगडावरील चोर दरवाजा खुला : दुर्गसेवकांची कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 2:15 PM
लोणावळा, खंडाळ्यासह मावळात पावसाळ्यात पर्यटकांची संख्या अफाट असते.
ठळक मुद्देबंद असलेला मार्ग मातीचा ढिगारा उपसून केला मोकळा