लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : कर्क रोगासारख्या दुर्धर आजारांबरोबर जीवनातील इतर समस्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास आरोग्यदायी जीवन जगता येऊ शकते. जगभरात हे नवे तंत्र विकसित होत असून, त्याद्वारे अनेक दुर्धर आजारांना रोखणे शक्य झाले आहे. त्यामुळे जीवनात नेहमी सकारात्मक राहा, असा जीवनदायी सल्ला आरोग्यतज्ज्ञ डॉ. गुरुराज मुतालिक यांनी गुरुवारी येथे दिला. जनसेवा फाउंडेशनच्या वतीने ‘आरोग्य आणि मन:शांती’ या विषयावर ते बोलत होते. प्रभात रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये हा कार्यक्रम झाला. अस्थिरोगतज्ज्ञ के. एच. संचेती, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती पी. डी. पाटील, बहारी मल्होत्रा, जनसेवाचे डॉ. विनोद शहा, पूना मर्चंट चेंबरचे माजी अध्यक्ष राजेश शहा या वेळी उपस्थित होते. मुतालिक म्हणाले, ‘‘मन:स्वास्थ्य आणि त्याचा शरीरावर होणारा परिणाम जगभर अभ्यासला जात आहे. हे नवीन तंत्र वेगाने विकसित होत आहे. भारताने पूर्वीपासूनच आयुर्वेद आणि योग यांद्वारे या शास्त्रावरच भर दिला आहे. आजाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर सकारात्मक असेल, तर औषधांचा परिणाम अधिक जलद आणि परिणामकारक होतो. नकारात्मकता ही नेहमीच विविध आजारांना आमंत्रण देणारी असते. एखाद्या आजारापुढे रुग्णानेच डोके टेकल्यास, औषधे परिणाम करीत नाहीत. मन:शांती आणि योगाचा उपयोग करून आपले आयुष्य आनंदी ठेवले पाहिजे.’’मन:शांतीद्वारे बायपाससारख्या शस्त्रक्रियेनंतरही ३० वर्षांहून अधिक काळ स्वस्थ जीवन जगत असल्याचा अनुभव एका व्यक्तीने सांगितला. रुग्णांचे मनोबल वाढविल्यास औषधे देखील लवकर परिणाम करतात, असा अनुभव एका डॉक्टरांनी सांगितला.
आजारांना हवा सकारात्मकतेचा डोस
By admin | Published: May 12, 2017 5:21 AM