बारामती : दुधाळ गार्इंची दूध उत्पादनक्षमता वाढविण्याच्या हव्यासापोटी तसेच पशुखाद्याला पर्याय म्हणून मद्यनिर्मिती कंपन्यांमधील चोथा विकण्याचा प्रकार बारामती, इंदापूर आणि परिसरातील भागांमध्ये सर्रास सुरू आहे. या चोथ्याला ‘बार्ली’ या नावाने संबोधले जाते. तसेच, या सडलेल्या चोथ्यामुळे गार्इंच्या व मानवी आरोग्याशीही खेळण्याचा प्रकार सुरू आहे. यावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याने परिसरात ‘बार्ली माफिया’ तयार होऊ लागले आहेत. मद्यनिर्मिती कंपन्यांमध्ये सडक्या गहू, बाजरी, तांदूळ, ज्वारी, मका यांच्यापासून दारू बनवली जाते. तर, राहिलेल्या चोथा ‘बार्ली माफिया’ कंपन्यांकडून केवळ एक ते दीड रुपया प्रतिकिलो दराने खरेदी करतात. हाच चोथा दुग्धोत्पादक शेतकऱ्याला ७ ते ८ रुपये प्रतिकिलो दराने विकला जातो. परिसरातील काही शेतकरी दुधाळ गार्इंची दूध उत्पादनक्षमता वाढावी, तसेच महागड्या पशुखाद्याला पर्याय म्हणून हा चोथा विकत घेत आहेत. मद्यनिर्मितीमधून राहिलेल्या या चोथ्यामध्ये अनेक प्रकारचे केमिकल व अल्कोहोलचे प्रमाण असते. त्यामुळे गार्इंच्या आरोग्याला तर धोका पोहोचतोच; मात्र त्यामध्ये असणाऱ्या अल्कोहोलमुळे हा चोथा खाणाऱ्या गाई २४ तास धुंदीत राहतात. तसेच यांच्यापासून मिळणारे दूधदेखील चवीला आंबूस व पिवळसर असते. तसेच, या दुधाची गुणवत्ताही कमी आहे. हे दूध मानवी आरोग्याला धोकादायक आहे. दूध संस्थांकडे हे दूध तपासण्याची यंत्रणा नाही. त्यामुळे सर्रास या दुधाची विक्री होत आहे. (प्रतिनिधी)
दूध वाढविण्यासाठी जनावरांना ‘डोस’
By admin | Published: October 13, 2016 2:30 AM