पुणे: डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याची पुणे महापालिकेत क्रीडा अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश नुकतेच राज्य सरकारकडून जारी करण्यात आले आहेत. पुणे महापालिकेत दोन क्रीडा अधिकारी पदे आहेत. एक पद पदोन्नतीने भरले जाते, तर दुसरे पद नामनिर्देशित असते. या पदावर शिवराजची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच शिवराजला नियुक्तीचे पत्र दिले. त्यामुळे शिवराज आता पुणे महापालिकेत क्रीडा अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. शिवराज राक्षे याने जानेवारी २०२३मध्ये महेंद्र गायकवाड याला चितपट करत पहिल्यांदा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला होता. त्यानंतर धाराशिव येथे नोव्हेंबर २०२३मध्ये त्याने हर्षवर्धन सद्गीर याला पराभूत करत दुसऱ्यांदा हा मानाचा किताब जिंकला होता.
राजगुरूनगरजवळ राक्षेवाडी गावच्या शिवराज याच्या आईवडिलांचे स्वप्न साकार झाले आहे. त्याचे आईवडील शेतीबरोबरच दुधाचा व्यवसाय करतात. शिवराजचे वडील आणि आजोबाही पैलवान होते. त्यामुळे शिवराजनेही पैलवान होऊन महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकावा अशी त्याच्या कुटुंबीयांची इच्छा होती.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवराजला सरकारी नोकरी देताना सरकार राज्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंच्या पाठीशी असल्याचे दाखवून दिले आहे.
डबल महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर सरकारी नोकरीच्या नियुक्तीचे पत्र मिळणे निश्चितच आनंददायक आहे. आईवडिलांच्या कष्टाचे हे फळ मिळाले आहे. आता खेळाडूंसाठी प्रामाणिकपणे काम करणार आहे. - शिवराज राक्षे, डबल महाराष्ट्र केसरी