पुणे : शहरात नुसते पांढऱ्या पट्ट्याच्या बाहेर थोडी जरी गाडी बाहेर आली असेल तर, वाहतूक पोलीस ती टेम्पोतून उचलून नेतात किंवा चारचाकी असेल तर तिला जॅमर लावला जातो़ पण ‘दिव्याखाली अंधार’ अशी मराठीत म्हण आहे़ तशीच परिस्थिती सध्या पुणे पोलीस आयुक्तालयाबाहेर दिसून येत आहे़ पोलीस आयुक्तालयाच्या दरवाजाबाहेरच आयुक्तालयात काम करणारे तसेच वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी गेले काही दिवस डबल पार्किंग करीत आहे़ मात्र, शहरभर कारवाई करणाºया वाहतूक शाखेला त्यांच्या मुख्य कार्यालयाबाहेरच वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असताना त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात असा आरोप केला जात आहे.
शहरात सध्या हेल्मेट न घालणाºया दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात सर्व वाहतूक पोलीस गुंतवले आहेत़ पुणे पोलीस आयुक्तालयाला एकूण तीन गेट आहेत़ त्यातील एक गेट वरिष्ठ अधिकाºयांच्या गाड्यांसाठी राखीव ठेवले आहे़ दुसरे गेट कुंड्या लावून बंद करण्यात आले आहे़ तेथून कोणतीही वाहने ये-जा करीत नाहीत़ फक्त परदेशी नागरिक व पासपोर्टच्या कामासाठी येणाºयांना त्या गेटच्या छोट्या दरवाजातून प्रवेश दिला जातो़ तिसºया गेटमधून सर्व पोलीस कर्मचारी, वाहतूक शाखेचे कर्मचारी आपल्या दुचाकी व अन्य पोलीस अधिकारी आपल्या चारचाकी घेऊन येतात़ मात्र, या ठिकाणचा रस्ता करण्यासाठी गेल्या १५ दिवसांपासून हे गेट बंद होते़ रस्ता झाल्यानंतर आता पुन्हा ड्रेनेजचे काम सुरू केल्याने गेल्या चार दिवसांपासून हे गेट पुन्हा बंद करण्यात आले़ त्यामुळे ऐरवी जी पोलिसांची दुचाकी वाहने आयुक्तालयाच्या कार्यालयात पार्क केली जात होती़ ती सर्व आता रस्त्यावर पार्क केली जातात़दोन्ही बाजूची पार्किंगला जागा नसली की सर्रास डबल पार्किंग केले जाते़ त्यात वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाºयांच्याही गाड्या असतात़ या गाड्यांमुळे अर्धा रस्ता व्यापला जात आहे़ त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहतूककोंडी होती़ या रस्त्यावरून वाहतूक शाखेचे कर्मचारी, पोलीस निरीक्षक तसेच वरिष्ठ अधिकारी नेहमीच जात असतात़ शहरात जाताना कोणी चुकीच्या जागी दुचाकी अथवा चारचाकी उभी केली असेल तर, वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी, कर्मचारी त्यांच्या गाडीतील स्पीकरवरून सूचना देऊन गाडी काढायला सांगतात किंवा त्यांच्यावर कारवाई होते़ परंतु, आयुक्तालयाच्या बाहेरच मोठ्या प्रमाणावर डबल पार्किंग होत असतानाही त्यांच्यावर कारवाई कोण करणार, असा प्रश्न आहे.वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी सांगितले की, याबाबत प्रशासनाच्या पोलीस उपायुक्तांशी माझे बोलणे झाले आहे़ जेव्हा जेव्हा आमच्या निदर्शनास आले़ पीक अवर्समध्ये आम्ही काढून घेण्यास सांगत होते़ आता ते काम झाले आहे़ त्यामुळे पुन्हा गाड्या आत लागतील़