पुणे: राज्यात होळीच्या काळात झालेल्या अवकाळी पावसामुळे सुमारे ३८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, त्यानंतर सुरू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रत्यक्ष नुकसानीचे पंचनामे झालेले नाही. त्यातच आता या आठवड्यात झालेल्या अवकाळीच्या गारपिटीच्या फटक्यामुळे शेतीचे आणखी नुकसान झाले आहे. परिणामी हा आकडा वाढणार आहे. मात्र, नुकसानीचे पंचनामे केव्हा होतील व मदत केव्हा मिळेल, असा प्रश्न शेतकरी आता विचारत आहेत. तर बाजारभावही कोसळलेले असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सुमारे ३८ हजार ६६४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यात जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक ८ हजार ९६६ हेक्टरचा समावेश आहे. त्याखालोखाल धुळे, संभाजीनगर येथील नुकसान झाले आहे. या पावसानंतर नुकसानीचे पंचनामे तातडीने हाती घेण्यात येतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली होती. त्यानंतर शनिवार, रविवारची सुटी आल्याने प्रत्यक्ष पंचनाम्यांना सोमवारी सुरुवात होणे अपेक्षित होते. त्यासाठी महसूल व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना एकत्रित पंचनामे करावे लागणार होते. मात्र, त्यानंतर लागलीच सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची बेमुदत संप पुकारला. त्यामुळे पंचनाम्यांना सुरुवातच होऊ शकली नाही. प्राथमिक अंदाजानुसार ३८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असले तरी प्रत्यक्ष पंचनामे झाल्यानंतर हा आकडा वाढण्याची शक्यता होती. पण पंचनामेच न झाल्याने हा नेमका आकडा हाती आलेला नाही. त्यामुळे मदतीची घोषणाही झालेली नाही. त्यानंतर गेले चार दिवस राज्यात अवकाळी पावसाने पुन्हा धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हाताशी आलेले पीक नष्ट झाल्याने शेतकऱ्यांनी कुणाच्या तोंडाकडे पाहावे, असा सवाल विचारला जात आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही मिटला नसल्याने दोनदा झालेल्या अवकाळीच्या नुकसीनाचा अंदाज अजूनही आलेला नाही. हा संप मिटल्यानंतरच हे पंचनामे केले जाणार आहेत. तोपर्यंत शेतकऱ्यांना केवळ वाट पाहावी लागणार असे चित्र आहे. याबाबत कृषी विभागातील अधिकारीही काहीही करू शकत नाहीत, अशी हतबलता व्यक्त करत आहेत. अवकाळीचा प्रभाव ओसरल्यावर तसेच संपच मिटल्यावरच पंचनामे करून मदत जाहीर केली जाईल, असे कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
पंचनामे वेळेत न झाल्यास मोठी अडचण निर्माण होईल. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय होईल. गव्हाची काढणी अजूनही होऊ शकलेली नाही, उन्हाळी पिकांचे नुकसान झालेले आहे. पंचनामा झाल्यानंतर हे नुकसान कळेल. त्यासाठी हे पंचनामे महत्त्वाचे आहेत. शेतकरी अडचणीत आहे. त्यात बाजारभावही कोसळलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवले आहे. - गजानन जाधव, कृषी अभ्यासक, औरंगाबाद