अंकुश जगताप, पिंपरीपूर्वी बहुतेक डझनावर अथवा नगावर मिळणारी फळे मिळणे आता बंद झाले आहे. स्थानिक फळबाजारावर मॉलसंस्कृतीचा प्रभाव वाढल्याने आता येथेही फळे घेण्यासाठी ग्राहकांना प्रतिकिलोच्या दरानुसार पैसे मोजण्याची वेळ आली आहे. व्यापारही चोखंदळ झाल्याने या बदलत्या पद्धतीचे अनेक चांगले वाईट परिणाम ग्राहक तसेच व्यापाऱ्यांच्या दृष्टीने होऊ लागले आहेत. परिसरात विशेषत: पुणे येथील गुलटेकडीच्या बाजारात राज्यातील, देशांतर्गत शेतकऱ्यांनी पिकविलेली फळे विक्रीस आणली जातात. येथे पूर्वापार पद्धतीनुसार फळांचा ठोक व्यापार सुरू होता. शेतकरी या बाजारात ट्रक, टेम्पोमधून फळे विक्रीस आणायचे. घाऊक व्यापाऱ्यांमार्फत अनेकदा उक्त्या पद्धतीने संपूर्ण फळांची बोली ठरविली जायची. अनेक फळे ही डझनाच्या तर काही नगाने खरेदी व्हायची. पिंपरी चिंचवड परिसरातील किरकोळ व्यापारी हीच फळे खरेदी करून शहरात विक्रीस आणायचे. शहरात विशेषत: पिंपरी मंडईत फळांचा मोठा व्यापार व्हायचा. अनेक हातगाडीवाले चौकाचौकांमध्ये, मुख्य रस्त्यांवरुन, गल्ल्यांमधून फिरून फळविक्री करायचे. विशेषत: आंबा, संत्री, मोसंबी, डाळींंब, चिकू, सीताफळ, केळी या फळांची डझनावर विक्री व्हायची. अंजीर, लिंबू यांची पाटीनुसार अथवा वाटा स्वरूपात विक्री होत असे. कलिंगड, पपई, अननस, खरबुजाचा खप नगावरच व्हायचा. यावेळी कधी ग्राहकाचा तर कधी किरकोळ विक्रेत्याला फायदा व्हायचा. मात्र या वेळी फळांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने ग्राहक तसेच व्यापारीही समाधानी असायचे, हे विशेष. मात्र पिंपरी - चिंचवड परिसरात गेल्या काही वर्षांत व्यापाराची पद्धतच बदलत आहे. आता कोणतेही फळ विकत घ्यायचे झाल्यास त्याच्या किलोच नाही तर प्रतिग्रॅमचेही पैसे मोजावे लागत असल्याचा प्रत्यय येत आहे. मक्याची कणसे व अनेक भाज्यांबाबतही हाच अनुभव येत आहे.
डझनावरील फळे आता मिळताहेत किलोने
By admin | Published: November 05, 2014 5:37 AM