लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शनिवार आणि रविवारी जोडून सुटी आली होती. मार्केट यार्डात भाजीपाल्याची आवक दुप्पट झाली. मात्र, दर निम्म्याने उतरले होते. शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळू शकले नाहीत. विशेषत: वांगी, दोडका, गवार, टोमॅटो, भेंडी, काकडी, फ्लॉवर आणि दुधीचे भाव जवळपास निम्म्याने दर उतरले आहेत. पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि आडते असोसिएशनने यापुढे सलग सुटी देताना विचार करावा, अशी मागणी मार्केट यार्डातील व्यापारी आणि शेतमाल विक्रीस आणलेल्या शेतकऱ्यांनी केली आहे.
शनिवार (दि. १४) रोजी साप्ताहिक सुट्टी तसेच रविवार (दि. १५) रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त सुटी जाहीर करण्यात आली होती. लागोपाठ दोन दिवस सुट्टी आल्यामुळे पुणे मार्केट यार्डात नेहमीपेक्षा येणाऱ्या मालाच्या तुलनेत जवळजवळ दुप्पट मालाची आवक झाली. शेतीमाल घेऊन येणाऱ्या वाहनांची संख्या ही जास्त प्रमाणात वाढली.
बाजार आवारात खूप मोठ्या प्रमाणात वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. शेतीमाल घेऊन येणाऱ्या बऱ्याच वाहनचालकांना याचा त्रास झाला. घेऊन आलेला शेतीमाल गाळ्यावर उतरवण्यासाठी ११ ते १२ वाजेपर्यंत वाट पाहावी लागल्याचे चित्र होते. शेतीमाल घेऊन येणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्यामुळे ग्राहकांच्या वाहनांना अडथळा निर्माण झाला. या सगळ्या गोष्टीचा परिणाम माल विक्रीवर झाला.
चौकट
या भाज्यांच्या भावात ५० टक्के घट (प्रतिकिलो)
वाण दर
वांगी १०-१२
दोडका ५-६
भेंडी ५-६
टोमॅटो ४-६
गवार ६-८
काकडी ४-६
दुधी ६-८
फ्लावर ३-६