दौंड : नगरपरिषदेचा २३ लाख ५६ हजार ९४१ रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक गुरूवारी प्रभारी नगराध्यक्ष योगेश कटारिया यांनी सादर केले. यात कुठल्याही कराचा बोजा वाढवला नाही. त्यामुळे दौंडकरांना दिलासा मिळाला आहे. भुयारी गटारची योजना पूर्णत्वाकडे असल्यामुळे वार्षिक ड्रेनेज कर लागू करण्यात येणार आहे. मात्र, हा कर सर्वसामान्यांना परवडेल असाच ठेवला पाहिजे अशी मागणी नगरसेवकांनी अर्थसंकल्पीय सभेत केली. अर्थसंकल्प सादर करण्यासाठी नगरपरिषदेत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रभारी नगराध्यक्ष योगेश कटारिया, मुख्याधिकारी शिवाजी कापरे, नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. नगरसेवक नंदू पवार, राजू बारवकर, जब्बार शेख, अनिल साळवे, गुरमुख नारंग, बबनजी सरनोत, आकांक्षा काळे, शीतल मोरे, प्रमोद देशमुख, संगीता बनसोडे यांच्यासह मुख्याधिकारी शिवाजी कापरे यांनी अर्थसंकल्पीय चर्चेत सहभाग घेतला. या वेळी नंदू पवार म्हणाले, की वर्षभरात फ्लेक्स बोर्डचा कर फक्त २९ हजार ५६0 रुपये नगर परिषदेकडे जमा झाला आहे ही बाब चिंतेची आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी फ्लेक्स बोर्डधारकांकडून कर आकारावा, यात कोणालाही वगळू नये. जब्बार शेख म्हणाले, शहरातील स्मशानभूमींच्या दुरुस्तीसाठी खर्चात वाढ करावी कारण माणसाचा शेवट स्मशानभूमीत होतो. तेव्हा ही जागा व्यवस्थित राहणे गरजेचे आहे. गुरुमुख नारंग यांनी कत्तलखान्यांचा कर वसूल केला जातो का, असा सवाल या वेळी केला. (वार्ताहर)
दौंडकरांना करवाढीत दिलासा
By admin | Published: February 27, 2015 5:56 AM