लोकमत न्यूज नेटवर्ककात्रज : पुणे शहराच्या दक्षिण उपनगरात वाढती वाहतूककोंडी सोडवण्यासाठी प्रलंबित डीपी रस्ते विकसित करण्याची गरज निर्माण झाली आहे. याचाच एका भाग म्हणून भारती विद्यापीठ परिसरात होणारी नित्याची कोंडी फुटावी, म्हणून वंडरसिटी ते राजाराम चौक हा १२ मीटर डीपी विकसित व्हावा, या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. कात्रज देहूरोड बाह्यवळण वंडरसिटी ते राजाराम चौक हा १२ मीटर डीपी रस्ता पालिकेच्या जुन्या व नव्या विकास आराखड्यात आहे. मात्र हा रस्ता कात्रज डेअरीच्या जागेतून जात आहे. या आरक्षित रस्त्यावर कात्रज डेअरी मालकीचे ४०० चौरस फुटाचे आठ कर्मचारी निवास आहेत. तसेच दगडी भिंत आहे. सन २००८ व २०१३ मध्ये कात्रज डेअरी प्रशासनाने पालिका प्रशासनाला पत्र देऊन कळवले होते की, या रस्त्याच्या विकसनात जाणारे आठ कर्मचारी निवास व दगडी भिंत बांधून दिल्यास जागा हस्तांतरणास आमची हरकत नाही. मात्र पालिका प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे भारती विद्यापीठ परिसरातील वाहतूककोंडी व लहान मोठ्या अपघातांची मालिका सुरूच आहे.या संदर्भात कात्रज डेअरीचे चेअरमन विष्णू हिंगे म्हणाले, की कात्रज डेअरी संस्था या भागातील नागरिकांच्या वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या डीपी रस्त्यासाठी जागा हस्तांतरण करण्यास अनुकूल आहे. मात्र पालिका प्रशासनाने कर्मचारी निवास व भिंत बांधून द्यावी, असे सांगितले.
डीपी रस्ता मार्गी लागणार
By admin | Published: May 10, 2017 4:17 AM