बापमाणूस! डॉक्टर होण्याचे स्वप्न उरी बाळगणाऱ्या'ऋतुजा'च्या पंखांना डॉ. अमोल कोल्हेंचे पाठबळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 06:12 PM2020-08-13T18:12:15+5:302020-08-13T22:06:33+5:30

आदिवासी क्षेत्रातील हलाखीची परिस्थिती असलेल्या कुटुंबातील ऋतुजाने दहावीच्या परीक्षेत मिळवले ९९.६० गुण..

Dr. Amol Kolhe Support to 'Rutuja' who dreams of becoming a doctor | बापमाणूस! डॉक्टर होण्याचे स्वप्न उरी बाळगणाऱ्या'ऋतुजा'च्या पंखांना डॉ. अमोल कोल्हेंचे पाठबळ 

बापमाणूस! डॉक्टर होण्याचे स्वप्न उरी बाळगणाऱ्या'ऋतुजा'च्या पंखांना डॉ. अमोल कोल्हेंचे पाठबळ 

Next
ठळक मुद्देखासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या 'जगदंब प्रतिष्ठान'च्या वतीने अ‍ॅण्ड्रॉईड मोबाईल भेट

नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील आदिवासी 'पेसा' क्षेत्रातील आमलेवाडी बोतार्डे येथील ऋतुजाने दहावीच्या परीक्षेची तयारी करताना घराच्या भिंतीवर ९९.९९ टक्के गुण मिळवून डॉक्टर होण्याची इच्छा प्रकट केली होती. त्यानुसार ९९.६० टक्के गुण मिळवून तिने पहिलं स्वप्नं पूर्ण केले. परंतु, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने पुढचं शिक्षण कसं घ्यावे हा प्रश्न तिच्यासमोर उभा होता. खरंतर तिने डॉक्टर होण्याचं पाहिलेलं स्वप्न आणि त्यासाठी अपार कष्ट घेण्याची दाखवलेली तयारी ही निश्चितच दखलपात्र होती. पण हे असले तरी आजच्या काळात शिक्षण घेणे तसे सोपे राहिलेले नाही याची जाणीव ऋतुजाला व तिच्या कुटुंबाला होती. परंतु, शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ऋतुजाचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारुन डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

बोतार्डेच्या (आमलेवाडी) ऋतुजा प्रकाश आमले हिने दहावीच्या परीक्षेत ९९.६० गुण मिळवून डॉक्टर होण्याचे स्वप्न पहिले होते. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अतिशय गरीब कुटुंबातील ऋतुजाच्या आर्थिक परिस्थितीची तातडीने दखल घेऊन तातडीने आपल्या 'जगदंब प्रतिष्ठान'चे श्री. विजय कोल्हे,अतुल कांकरिया, अतुल आहेर, जयेश कोकणे, शेखर शेटे, आशिष हांडे, तेजस झोडगे आदी सहकाऱ्यांना तिच्या घरी पाठवले. श्री. विजय कोल्हे यांच्या हस्ते ऋतुजाला ऑनलाईन अभ्यासासाठी आवश्यक असणारा अ‍ॅण्ड्रॉईड मोबाईल भेट देण्यात आला.

ऋतुजाचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारल्याबद्दल तिच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त करीत अशाप्रकारे संवेदनशीलपणे काम करणारा खासदार लोकप्रतिनिधी लाभला याचा मनस्वी आनंद व्यक्त केला.

या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, ग्रामीण भागातील विशेषतः बोतार्डेसारख्या आदिवासी क्षेत्रातील हलाखीची परिस्थिती असलेल्या कुटुंबातील एक मुलगी कष्टाने शैक्षणिक यश मिळवते, डॉक्टर होऊन समाजाची सेवा करण्याचा निश्चय करते हीच मुळात कौतुकास्पद बाब आहे. अशा गुणवान व आपल्या समाजासाठी काहीतरी करण्याची मनिषा बाळगणाऱ्या ऋतुजाचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारुन तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करण्याचं भाग्य मला लाभलं ही माझ्यासाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे, अशी भावना डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केली.

Web Title: Dr. Amol Kolhe Support to 'Rutuja' who dreams of becoming a doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.