ग्लेनमार्क फार्मास्युटिकल कंपनीला स्पष्टीकरण देण्याची नोटीस; डॉ. अमोल कोल्हेंचा दणका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 01:03 PM2020-07-20T13:03:14+5:302020-07-20T13:15:20+5:30
खासदार डॉ. कोल्हे यांनी जागरुकता दाखवत कोविड रुग्णांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न हाणून पाडला.
शेलपिंपळगाव : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) ''FABIFLU''च्या खोट्या दाव्याप्रकरणी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल कंपनीला स्पष्टीकरण मागविण्यासाठी नोटीस बजावली. दरम्यान ग्लेनमार्क कंपनीने या गोळीचे दर कमी करुन ७५ रुपयांवर आणण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
देशभरात कोविड-१९चा प्रादुर्भाव वाढत असतानाच जून महिन्यात ग्लेनमार्क फार्मास्युटिकल कंपनीने Fabiflu नावाचे अॅन्टीव्हायरल औषध बाजारात उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. यावेळी Fabiflu ही टॅबलेट उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या रुग्णांसाठी प्रभावी असल्याचा दावा केला होता. तसेच एका गोळीची किंमत रु. १०३ यानुसार १४ दिवसांच्या उपचारासाठी रु.१२,५०० इतका दर निश्चित केला होता.
ग्लेनमार्कच्या घोषणेनंतर खासदार डॉ. कोल्हे यांनी दि. २४ जून रोजी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि डीसीजीआयकडे रीतसर पत्र पाठवून तक्रार केली होती. इतकेच नव्हे तर ज्येष्ठ खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत पुण्यात झालेल्या कोविड उपाययोजनेबाबतच्या आढावा बैठकीत ग्लेनमार्कच्या दाव्यावर आक्षेप घेतला होता. यावेळी डॉ. कोल्हे यांनी Fabiflu या गोळीची रु. १०३ ही किंमत अवास्तव असून भारतातील गरीब, निम्न मध्यमवर्गीय व मध्यमवर्गीय नागरिकांना परवडणारी नसल्याचे मत व्यक्त केले होते. त्याचबरोबर ग्लेनमार्कने केलेली चाचणी प्रोटोकॉल समरीनुसार को-मॉर्बिड परिस्थितीत Fabiflu चे मूल्यांकन करण्यासाठी तयार केलेली नसल्याकडे डॉ. कोल्हे यांनी सर्वांचे लक्ष वेधले होते.
डॉ. कोल्हे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि डीसीजीआयकडे केलेल्या तक्रारीची दखल घेत अखेर डीसीजीआयने ग्लेनमार्क फार्मास्युटिकल कंपनीकडे स्पष्टीकरण मागणारी नोटीस बजावली. दरम्यान डॉ. कोल्हे यांनी गोळीच्या किंमतीबाबत घेतलेल्या आक्षेपाची दखल घेत ग्लेनमार्क कंपनीने या गोळीची किंमत ७५ रुपये प्रती गोळी इतकी कमी केली असून आता १४ दिवसांच्या कोर्ससाठी रु.९१५० इतका खर्च येणार आहे.
.............................
खासदार डॉ. कोल्हे यांनी जागरुकता दाखवत कोविड रुग्णांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न हाणून पाडला. तसेच औषधाची किंमत कमी करण्यास भाग पाडले. त्यांच्या जागरुकतेबद्दल वैद्यकीय व्यवसायातील जाणकारांनी त्यांचे कौतुक केले आहे.
...............................
'कोविड-१९च्या वाढत्या धोक्याच्या काळात अशाप्रकारे दावे वा जाहिराती करून सर्वसामान्य रुग्णांची फसवणूक होऊ नये. तसेच परिस्थितीचा गैरफायदा घेऊन कुणीही औषधांची अवास्तव किंमत आकारू नये. तसेच ग्लेनमार्कने ऋुं्रा’४ या गोळीची किंमत ७५ रुपये केल्याने या लढ्याला पहिलं यश मिळाले असून पुढील काळात सर्वसामान्य रुग्णांची फसवणूक होऊ नये आणि उपचाराचा खर्च आवाक्यात राहावा यासाठीचा आपला लढा सुरूच ठेवणार आहे.
- डॉ. अमोल कोल्हे, खासदार.