डॉ. अमोल कोल्हेंची कामगिरी दमदार, लोकसभेतील ३ ऱ्या क्रमांकाचे खासदार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 03:18 PM2023-07-11T15:18:35+5:302023-07-11T15:36:50+5:30
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्यानंतर त्यांतील आमदार आणि खासदारही दोन गटात विभागले गेले आहेत. अजित पवार आणि ...
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्यानंतर त्यांतील आमदार आणि खासदारही दोन गटात विभागले गेले आहेत. अजित पवार आणि शरद पवार यांच्या नेृत्त्वातील दोन गट राष्ट्रवादीची धुरा सांभाळत असून सुप्रिया सुळेंसह खासदार अमोल कोल्हे हेही शरद पवार गटात आहेत. अजित पवारांच्या शपथविधीला उपस्थित असलेल्या खासदार कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे सांगितले. त्यानंतर, बंडखोर नेत्यांविरुद्ध भाषणातून आवाजही उठवला. त्यामुळे, सध्या अमोल कोल्हे चांगलेच चर्चेत आहेत. मात्र, आता वेगळ्याच कारणानं त्यांचं कौतुक होतंय.
लोकसभेत यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रथमच खासदार बनून निवडून गेलेल्या खासदारांच्या कामगिरीचा आढावा एका सर्वेक्षणातून घेण्यात आला आहे. या सर्वेक्षणात राष्ट्रवादीचे खासदार आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी डॉ. अमोल कोल्हे यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याचं समोर आलं आहे. या यादीत खा. अमोल कोल्हेंचा देशात तिसरा क्रमांक आला आहे.
१७ व्या लोकसभेत एकूण २७० खासदारांनी प्रथमच संसदेत एंट्री केली. त्यामध्ये, शिरुर मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हेही आहेत. मात्र, या २७० खासदारांमध्ये आपल्या कामगिरीच्या जोरावर त्यांनी देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे. या यादीत काँग्रसेच खासदार कुलदीप राज शर्मा यांचा पहिला क्रमांक असून त्यांना ८६४ गुण आहेत. सुकांता मुजामदार यांचा दुसरा क्रमाक लागतो, त्यांना ५८८ गुण आहेत. तर, ५५४ गुणांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा तिसरा क्रमांक आहे. त्याबद्दल राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी कोल्हेंचं अभिनंदन केलंय. त्यावर, प्रतिक्रिया देताना, तुमच्या मार्गदर्शनामुलेच हे शक्य झालं, तुमचंही मोठं योगदान असल्याचं सुळेंनी म्हटलं. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही ट्विट करुन खासदार कोल्हे यांचं अभिनंदन केलंय.
धन्यवाद @supriya_sule ताई, आपल्या मार्गदर्शनाचा आणि प्रोत्साहनाचा यात सिंहाचा वाटा आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी यापुढील काळातही मी सदैव प्रयत्न करेन. https://t.co/M65iGpHSg9
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) July 11, 2023
लोकसभेवर प्रथमच निवडून गेलेल्या खासदारांमध्ये अतिशय उज्ज्वल कामगिरी करणाऱ्या सदस्यांत देशात तिसरा क्रमांक पटकाविल्याबद्दल शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे हार्दिक अभिनंदन. त्यांची हि कामगिरी आम्हा सर्वांसाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा, असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलंय.
भाषणातून फडणवीसांवर निशाणा
सध्याची ही लढाई ही अधर्माची आहे. महाभारताचा विचार करतो, तेव्हा हाच तो शकुनी मामा आहे, ज्याच्यामुळं महाभारत घडलं. आपण विरोधात असलं तर त्याला कौरव म्हणतो. त्याची संख्या कमी असते त्याला पांडव म्हणतो. त्यापलीकडे जाऊन संस्कृती अशी होती, की काही आक्रमण आलं तर कौरव पांडव भाऊ होते, ते एकत्र येऊन मुकाबला करत होते. मात्र, त्यात मिठाचा खडा कोणी टाकला तर तो शकुनी मामा याने. आता हा शकुनी मामा कोण? असा सवाल अमोल कोल्हे यांनी विचारताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.