पुणे : राज्याच्या वैदयकीय शिक्षण आणि संशाेधन संचालनालयाच्या (डीएमईआर) संचालकपदाचा कार्यभार सध्या याच विभागाचे सहसंचालक (वैदयकीय) डाॅ. अजय चंदनवाले यांना देण्यात आला आहे. त्यांचे महाराष्ट्र शासनाचे सहसचिव शिवाजी पाटणकर यांनी हा आदेश गुरूवारी काढला.
याआधी या विभागाचा संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार नांदेडच्या डाॅ. शंकरराव चव्हाण शासकीय वैदयकीय महाविदयालयाचे प्रभारी अधिष्ठाता डाॅ. दिलीप म्हैसेकर यांना दाेन वर्षापूर्वी देण्यात आला हाेता. आता ताे कार्यभार डाॅ. चंदनवाले यांना देण्यात आला आहे. डाॅ. चंदनवाले यांनी सहसंचालक पदाचा कार्यभार सांभाळून संचालक पदाचीही जबाबदारी त्यांना सांभाळायची आहे.
डाॅ. चंदनवाले यांची धडाकेबाज आणि कार्यक्षम अधिकारी अशी ओळख आहे. यांची सहसंचालक पदावर पदाेन्नती ऑक्टाेबर २०१९ ला झाली हाेती. त्याआधी त्यांनी ससून रुग्णालयात अधिष्ठाता म्हणून काम केलेले आहे. त्यांच्या कार्यकालात त्यांनी ससून रुग्णालयात पेशंटच्या हितासाठी अनेक निर्णय घेत हाॅस्पिटलचा विविध अंगाने विकास करण्यावर भर दिला हाेता. सरकारी निधीच्या भरवशारवर न बसता १०० काेटी रूपयांचा सीएसआर फंड जमा करून त्यातून रुग्णालयाचे विविध विभाग विकसित केले आहेत.
डाॅ. चंदनवाले यांच्यापुढे सध्या अनेक आव्हाने आहेत. राज्यातील २३ शासकीय वैदयकीय महाविदयालये तथा हाॅस्पिटलमधील तज्ज्ञ डाॅक्टरांची कमतरता भरून काढणे, तज्ज्ञ डाॅक्टरांच्या काैशल्यांचा सर्वसामान्य जनतेला पुरेपुर वापर व्हावा अशा रितीने व्यवस्था निर्माण करणे, अधिष्ठाता, वैदयकीय अधीक्षकांच्या मनमानी कारभारावर चाप बसवणे आणि एकंदरित हाॅस्पिटलची सेवा खासगी हाॅस्पिटलच्या ताेडीस ताेड तयार करणे व संशाेधनाला बळ देणे ही आहेत.