पुणे : भारत इतिहास संशोधक मंडळाच्या १११ वा वर्धापनदिन कार्यक्रमात राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांना भारतीय ऐतिहासिक अनुसंधान परिषदेचे अध्यक्ष अरविंद जामखेडकर यांच्या हस्ते 'ज्येष्ठ इतिहास संशोधक सरदार आबासाहेब मुजुमदार पुरस्कार' प्रदान करण्यात आला.
मंडळाच्या राजवाडे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला उद्योजक अजित गाडगीळ, मंडळाचे चिटणीस पांडुरंग बलकवडे, डॉ. चंद्रकांत अभंग आणि मुजुमदार यांच्या नातसून अनुपमा मुजुमदार उपस्थित होते. मंडळाचे उपाध्यक्ष बी. डी. कुलकर्णी अध्यक्षस्थानी होते. मंडळाच्या त्रैमासिकाचे तसेच अनुपमा मुजुमदार लिखित 'सरदार आबासाहेब मुजुमदार ऐतिहासिक लेखसंग्रह' पुस्तकाचे प्रकाशन झाले.
आबासाहेब मुजुमदार यांच्या नावाचा पुरस्कार पावित्र्याची बाब आहे. आई-वडिलांमुळे मी इथपर्यंत पोहोचलो. वडील म. श्री. दीक्षित सार्वजनिक जीवनात असल्याने आर्थिक झळा सोसल्या; पण त्यांनी मनाच्या श्रीमंतीचा वारसा दिला. तो जपण्याचा प्रयत्न करत आहे अशी भावना प्रा. डॉ. राजा दीक्षित यांनी व्यक्त केली.
मंडळाकडे सुमारे दहा लाखांहून अधिक मोडी लिपीतील कागदपत्रे, ३० हजार पोथ्या आणि इतिहासावरील ४० हजार संदर्भ ग्रंथ आहेत. त्यापैकी १२ हजार पोथ्यांचे डिजिटायझेशन आणि सूचीकरण करण्यात आले आहे. नॅशनल मॅन्युस्क्रिप्ट मिशनच्या माध्यमातून मोडी या कागदपत्रांचे आणि दुर्मीळ ग्रंथांचे डिजिटायझेशन करण्यात येत आहेत. मंडळाकडे ३० हजार लघुचित्रांचा (मिनिएचर पेंटिंग्ज) संग्रह आहे. मंडळाचे इतिहास संशोधक संदीप भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली १७०० रुमाल (कागदपत्रांचे बाड) व्यवस्थित करण्यात आले आहेत,' अशी माहिती बलकवडे यांनी पत्रकारांना दिली.
---------------------------------------------------------------------------------------------------------------
आजीव सभासदत्व खुले
'भारत इतिहास संशोधक मंडळाचे कामकाज लोकाभिमुख व्हावे आणि अधिकाधिक युवकांनी इतिहास अभ्यासाच्या प्रवाहात सहभागी व्हावे या उद्देशातून तीन दशकांनंतर आजीव सभासदत्व खुले केले आहे. आजीव सभासद शुल्क पाच हजार रुपये निश्चित करण्यात आले आहे. नवीन धोरणानंतर नवीन साडेपाचशे सभासद झाले असून एकूण सभासद आठशे-साडेआठशे आहेत,' असे नंदकुमार निकम यांनी सांगितले.
----------