पुणे : वयाच्या ९५ व्या वर्षीही ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी मतदान केंद्रापर्यंत जाऊन उत्साहाने मतदान केले. बाबांच्या आतापर्यंतच्या कामात त्यांना त्याच असीम उत्साहाने साथ देणाऱ्या त्यांच्या जीवनसाथी व माजी मुख्य परिचारिका शीला यांनी याही कामात बाबांना साथ देत त्याच उत्साहात मतदान केले. पर्वती विधानसभा मतदार संघात राहत्या घरापासून जवळच असणाऱ्या बिबवेवाडी येथील महापालिकेच्या शाळेत आढाव पती-पत्नींचे मतदान आहे.
घरून मतदान करण्याची सवलत त्यांना वयामुळे होती. मात्र, बाबांनी त्याला नकार देत स्वत: मतदान केंद्रापर्यंत जाऊन मतदान केले. यावेळी बाबा म्हणाले, ‘आपण नेहमीच हक्कांसाठी भांडतो, त्याविषयी बोलतो, पण कर्तव्य बजावताना मात्र मागे पडतो. लोकशाही राज्यव्यवस्थेत ते अपेक्षित नाही. कर्तव्याविषयीही आपण जागरूक असायला हवे. १९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून अगदी अपवादानेच माझ्याकडून एखादे मतदान करण्याचे राहून गेले असावे.’
पर्वती विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार माधुरी मिसाळ, राष्ट्रवादी ( शरद पवार ) पक्षाच्या अश्विनी कदम आणि काँग्रेस पक्षाचे बंडखोर उमेदवार आबा बागूल यांच्यात तिरंगी लढत होत आहे. आबा बागुल हे उमेदवारीसाठी काँग्रेसकडून इच्छुक होते. मात्र त्यांना आघाडीकडून डावलण्यात आले. पर्वती विधानसभेची जागा राष्ट्रवादीची असल्याने शरद पवार गटाला ही जागा मिळाली. त्यानंतर बागुल यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरला आहे. त्यामुळे पर्वती विधानसभा मतदार संघात तिरंगी लढत होत आहे. आता या निवडणुकीत कोणाचा झेंडा फडकणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आजच मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लोकांनी निवडून दिलेला उमेदवार मतपेटीत बंद आहे. शनिवारी जिंकलेल्या उमेदवाराचे नाव समोर येण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.