पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी गुरुवारी सकाळपासून आत्मक्लेष उपोषण सुरू केले. आताच्या निडणुकांचा संदर्भ देऊन लोकशाही मूल्ये पायदळी तुडवली जात असल्याच्या निषेधार्थ महात्मा फुले पुण्यतिथीदिनी असे आंदोलन करणार असल्याचे डॉ. आढाव यांनी संविधानदिनी जाहीर केले होते. माजी मंत्री व समता परिषदेचे नेते छगन भूजबळ यांनी सकाळी त्यांची भेट घेऊन प्रकृतीची काळजी घेण्याचे आवाहन केले.
महात्मा फुले समता भूमीमध्येच डॉ. आढाव उपोषणाला बसले आहेत. त्यांच्यासमवेत सामाजिक कार्यकर्ते नितीन पवार, गोरख सांगडे व अन्य काही जणही बसले आहेत. भुजबळ यांच्या समता परिषदेच्या समता पुरस्काराचे वितरण गुरुवारी सकाळी याच स्थळी होते. तिथे जाण्यापूर्वी भुजबळ यांनी डॉ. आढाव यांची भेट घेतली. वयाच्या ९४ व्या वर्षी उपोषण करू नये, अशी विनंती त्यांनी केली. मात्र डॉ. आढाव यांनी त्यांना नकार दिला. प्रकृतीची काळजी घ्या, असे आवाहन त्यानंतर भुजबळ यांनी केले. त्याचबरोबर आ. रोहित पवार, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड व अन्य काही पदाधिकाऱ्यांनी डॉ. आढाव यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली.
उपोषण आंदोलनादरम्यान थोड्याथोड्या वेळाने डॉ. आढाव जमलेल्या कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधत होते. १९५२ पासून झालेल्या देशाच्या प्रत्येक निवडणुकीचा मी साक्षीदार आहे. आता निवडणुका इतक्या महाग करून ठेवल्या आहेत की, सामान्य माणूस निवडणूक लढवण्याचा विचारही करू शकत नाही. लोकशाही व्यवस्थेत हे अभिप्रेत नव्हते. यावेळची निवडणूक तर पैसे वाटपाच्या सर्व मर्यादा ओलांडणारी होती अशी टीका डॉ. आढाव यांनी केली. याचा प्रतिकार करणे आवश्यक आहे, त्यासाठी कोणीतरी पुढाकार घ्यायला हवा, तो मी घेत आहे, कारण मी जीवनभर मूल्यांसाठीच लढत आलो आहे, असे ते म्हणाले.
डॉ. आढाव हे आत्मक्लेश आंदोलन ३० नोव्हेंबरपर्यंत करणार आहेत. या वयात त्यांना हा त्रास झेपेल का याची काळजी कार्यकर्त्यांना वाटते आहे. त्यांच्याकडूनही डॉ. आढाव यांना आंदोलन थांबवण्यासाठी सांगण्यात येत होते. मात्र मला काहीही होणार नाही असे सांगत डॉ. आढाव यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.